पाणंद रस्त्यासाठी महिला धडकल्या तहसील कार्यालयात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:25 AM2021-07-22T04:25:46+5:302021-07-22T04:25:46+5:30
सुरकंडी येथील दगड उमरा या गावाकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याचे भिजत घोंगडे वर्षानुवर्षांपासून रेंगाळलेले आहे. या पाणंद रस्त्यावरून अनेक शेतकऱ्यांना ...
सुरकंडी येथील दगड उमरा या गावाकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याचे भिजत घोंगडे वर्षानुवर्षांपासून रेंगाळलेले आहे. या पाणंद रस्त्यावरून अनेक शेतकऱ्यांना जावे लागते. सद्यस्थितीत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे शेतात जायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत शेतातील निंदनाची कामे सुरू आहेत. रस्त्याअभावी शेतीची कामे प्रभावित होत आहेत. पाणंद रस्ता विनाविलंब दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी महिलांनी तहसीलदारांकडे केली. तहसील, पोलीस प्रशासन तसेच ग्रामपंचायतच्या समन्वयाने हा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, असा सूर महिलांमधून उमटत आहे.
००००
... तर आंदोलनाचा इशारा
पाणंद रस्त्याअभावी शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे. हा प्रश्न निकाली निघत नसल्याचे पाहून महिलांनी आक्रमक पवित्रा घेत पाणंद रस्त्याचा प्रश्न तत्काळ मार्गी न लागल्यास मोठे आंदोलन उभारू, असा इशारा महिलांनी दिला.
००००
निधी मंजूर, पण कामाला सुरुवात नाही
मागील तीन वर्षांपासून या पाणंद रस्त्यांसाठी निधी आलेला आहे; मात्र हा निधी प्रशासनाने खर्च केला नसल्याची माहिती आहे. राजकारण, आपसी वाद बाजूला ठेवून परस्पर समन्वयातून पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली निघाला तर शेतकऱ्यांची गैरसोय टळेल, यात शंका नाही.