दारूबंदीसाठी महिलांनी गाठले पोलिस स्टेशन; गणेशोत्सवाच्या दिवशीच एल्गार, मुलेही दारूच्या आहारी
By संतोष वानखडे | Updated: September 19, 2023 18:30 IST2023-09-19T18:29:46+5:302023-09-19T18:30:04+5:30
खुलेआम दारूविक्री होत असल्याने मालेगाव तालुक्यातील वरदरी बु. येथील युवावर्गासह पुरूष दारूच्या आहारी गेले आहेत.

दारूबंदीसाठी महिलांनी गाठले पोलिस स्टेशन; गणेशोत्सवाच्या दिवशीच एल्गार, मुलेही दारूच्या आहारी
वाशिम: खुलेआम दारूविक्री होत असल्याने मालेगाव तालुक्यातील वरदरी बु. येथील युवावर्गासह पुरूष दारूच्या आहारी गेले आहेत. या पार्श्वभूमीवर दारूविक्री बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी गणेशोत्सवाचा सण काही वेळेसाठी बाजूला ठेवून १९ सप्टेंबर रोजी जऊळका रेल्वे पोलिस स्टेशन गाठून ठाणेदारांपुढे व्यथा मांडला. जवळका पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरदरी बुद्रुक येथे गावठी हातभट्टी व्यवसायाला उधाण आले आहे.
गावामध्ये हातभट्टीची दारू सहज मिळत असल्याने तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली. या व्यसनाधीनतेमुळे गावातील शांतता धोक्यात येत असून, दारूड्या पतींकडून मारहाणही होत असल्याचे महिलांनी निवेदनात नमूद केले. शाळकरी मुलेही दारूच्या आहारी जात असल्याने त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वरदरी येथील दारूविक्री बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी मंगळवारी जऊळका रेल्वे पोलिस स्टेशन गाठून ठाणेदारांना निवेदन दिले. दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले.