महिला शिक्षक स्वेच्छेने स्विकारू शकतील मुख्याध्यापक पदाचा प्रभार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 03:32 PM2018-10-01T15:32:47+5:302018-10-01T15:32:53+5:30
सेवाज्येष्ठ महिला शिक्षिकेने स्वत:हून प्रभार घेण्यास लेखी स्वरुपात नकार दिला तर संबंधित शाळेवरील तद्नंतरच्या सेवाज्येष्ठ शिक्षकास आता प्रभार घ्यावा लागणार आहे.
वाशिम : जिल्हा परिषदेच्या शाळांवरील मुख्याध्यापक पद रिक्त असल्यास, नियमानुसार सदर पदाचा प्रभार सेवाज्येष्ठ शिक्षकांकडे सोपविला जातो. सेवाज्येष्ठ महिला शिक्षिका असल्यास आणि प्रभार घेण्यास लेखी स्वरुपात नकार दिला तर या पदाचा प्रभार यापुढे तद्नंतरच्या सेवाज्येष्ठ शिक्षकास देण्यात यावा, असे आदेश अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांनी २६ सप्टेंबर रोजी काढले. या आदेशाची प्रत विभागातील पाचही प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी रवाना करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या शाळांवर मुख्याध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे शाळेच्या दैनंदिन कामकाजात व्यत्यय निर्माण होऊ नये म्हणून या पदांचा प्रभार अन्य सेवाज्येष्ठ असणाºया शिक्षकांकडे सोपविला जातो. जिल्हा परिषदेच्या ज्या शाळेवर मुख्याध्यापकाचे पद मंजूर नाही अथवा रिक्त आहे, त्या शाळेवरील मुख्याध्यापक पदाचा प्रभार देताना सेवाज्येष्ठ महिला शिक्षिका असल्यास संबंधित शिक्षिकेकडे प्रभार सोपविणे क्रमप्राप्त आहे. मात्र, या सेवाज्येष्ठ महिला शिक्षिकेने स्वत:हून प्रभार घेण्यास लेखी स्वरुपात नकार दिला तर संबंधित शाळेवरील तद्नंतरच्या सेवाज्येष्ठ शिक्षकास आता प्रभार घ्यावा लागणार आहे. तसे आदेश अमरावतीच्या शिक्षण उपसंचालकांनी काढले. एखाद्या शाळेवर कार्यरत शिक्षकांमध्ये सर्व महिला शिक्षिका असल्यास नियमानुसार या शाळेवरील मुख्याध्यापक पदाचा प्रभार मात्र सेवाज्येष्ठ महिला शिक्षिकांकडेच राहणार आहे. महिला शिक्षकांना आता स्वच्छेने मुख्याध्यापक पदाचा प्रभार स्वत:कडे ठेवायचा की शाळेतील तद्नंतरच्या सेवाज्येष्ठ शिक्षकांकडे सोपवायचा, असे दोन पर्याय खुले आहेत.
सेवाज्येष्ठ महिला शिक्षिकेने स्वत:हून प्रभार घेण्यास लेखी स्वरुपात नकार दिला तर संबंधित शाळेवरील तद्नंतरच्या सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा प्रभार सोपविण्यात यावा, अशा लेखी सूचना अमरावती विभागातील प्राथमिक शिक्षण विभागाला दिलेल्या आहेत.
-अंबादास पेंदोर,
शिक्षण उपसंचालक, अमरावती.