दारूबंदीसाठी मोपच्या महिलांचा ‘एल्गार’
By admin | Published: July 21, 2015 12:52 AM2015-07-21T00:52:17+5:302015-07-21T00:52:17+5:30
गावातील दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा.
वाशिम : दारूच्या व्यसनाने कुटुंबाची राखरांगोळी होते. संसार उद्ध्वस्त करणारी ही दारू गावातून हद्दपार करायचीच, असा निर्धार जिल्ह्यातील मोप (ता. रिसोड) येथील महिलांनी केला आहे. गावातील दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी शेकडो महिलांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात मोपच्या महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलीस प्रशासनाकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की मोप येथे देशी दारूचे दुकान आहे. हे दुकान डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असून, चोहोबाजूंनी दलितबहुल वस्ती आहे. दुकानात लोक दारू पिऊन महिलांना अश्लील शिवीगाळ करतात. त्यामुळे नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. काही महिलांचे पती कुठलेच काम न करता सायंकाळी दारू पिऊन रात्नभर घरी धिंगाणा घालतात. हे दारूडे घरातील भांडीकुंडी, ज्वारी, बाजरी आदी धान्य बाजारात विकून दारू पितात. त्यामुळे गावातील कित्येक महिलांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. गावातच देशीदारूचे दुकान असल्यामुळे तरुणच नव्हे, शाळकरी मुलेही व्यसनांच्या आहारी जाण्याची दाट शक्यता उद्भवली आहे. दारूच्या व्यसनामुळे गावातील अनेक कर्त्या पुरुषांना अकाली मृत्यूला सामोरे जावे लागले असून, कित्येक तरुणांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. मोप या गावातील देशी दारूच्या दुकानामधून परिसरातील मौजे चाकुली, भर, बोरखेडी, आसोला, कुर्हा, मांडवा, शेलू खडसे, लोणी बु, लोणी खु. आदी गावांमध्येदेखील देशी दारू पुरविली जाते. त्यामुळे परिसरातील कित्येक खेडी व्यसनाधीन होत आहेत.