दारुबंदीसाठी महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या
By admin | Published: July 4, 2015 12:07 AM2015-07-04T00:07:35+5:302015-07-04T00:07:35+5:30
ग्रामसभा बोलाविण्याची मागणी; शेकडो महिलांचा सहभाग.
वाशिम: शाळेच्या बाजुला असलेले देशी दारुचे दुकान बंद करण्याच्या मागणीसह गावात सुरु असलेली दारु विक्रीसंदर्भात रिसोड तालुक्यातील मोप येथील शेकडो महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर ३ जुलै रोजी धडकल्या. रिसोड तालुक्यातील ग्राम मोप येथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या बाजुला देशी दारुचे दुकान आहे. तसेच गावात अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात अवैध दारु विक्रीचे प्रमाणात वाढ झाली असल्याने अनेकांचे संसार उध्दवस्त होत आहेत. गावातील दारु हद्दपार करण्यासाठी रेखाबाई राजकुमार अंभोरे यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो महिला धडकल्यात. महिलांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून गावातील दारु दुकानासह सुरु असलेल्या अवैध दारु विक्रीबाबत कळविले. तसेच यावेळी महिलांच्यावतिने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यामध्ये महिलांनी म्हटले की, मोप येथील जिल्हा परिषद शाळेच्या बाजुलाच सरकारमान्य देशी दारुचे दुकान असल्याने याचा विपरित परिणाम बालकांवर होवू शकतो, तसेच गावात सुरु असलेल्या अवैध दारु विक्री मुळे अनेकांचे संसार उध्दवस्त होत असून गावात भांडणाचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. विशेष म्हणजे गावात विद्यार्थी सुध्दा दारुच्या आहारी जात आहेत. हे थांबविण्यासाठी सक्षम अधिकार्यांच्या उपस्थितीत गावात विशेष महिला ग्रामसभा बोलाविण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर रेखा अंभोरे यांच्यासह शेकडो महिलांच्या स्वाक्षर्या आहेत.