नाफेडमधील खरेदी केंद्रावर महिला शेतक-यांचा ‘तूर कल्लोळ’
By admin | Published: May 12, 2017 03:07 PM2017-05-12T15:07:50+5:302017-05-12T15:07:50+5:30
शासनाने नाफेडच्या खरेदीला 31 मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकरी बाजार समित्यांमधील नाफेडच्या खरेदी केंद्रांवर गर्दी करत असतानाच आता महिला शेतक-यांचीही झुंबड उडाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 12 - शासनाने नाफेडच्या खरेदीला 31 मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकरी बाजार समित्यांमधील नाफेडच्या खरेदी केंद्रांवर गर्दी करत असतानाच आता महिला शेतक-यांनीही या ठिकाणी झुंबड केली असून, नाफेडकडून टोकण मिळवण्यासाठी या महिला धडपड करताना दिसत होत्या.
यंदा जिल्ह्यासह राज्यभरात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. परंतु बाजारात व्यापा-यांनी भाव पाडल्याने शेतकरी अडचणीत आले. अशात शासनाने नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करून त्या ठिकाणी 5 हजार 50 रुपये प्रति क्विंटलच्या हमीदराने खरेदी सुरू केली. मात्र, या केंद्रांवर मोजणीची संथ प्रक्रिया, साठवणुकीची अडचण आणि बारदाणांचा तुटवडा आदी कारणांमुळे खरेदी वारंवार खंडीत झाली आणि 22 एप्रिलपर्यंतच्या वाढीव मुदतीच्या काळापर्यंत नाफेडकडे तूर विक्रीसाठी टाकणा-या हजारो शेतक-यांची तूर बाजार समितीच्या ओट्यांवरच पडून राहिली आहे.
यामुळे जिल्हाभरात तूर कल्लोळ सुरू झाला. याचदरम्यान राज्य शासनाने केंद्राकडे तुरीच्या खरेदीसाठी मुदतवाढ मागितली आणि केंद्रीय कृषीमंत्र्यांनी त्याला हिरवा कंदील देताना एक लाख टन तुरीची खरेदी 31 मेपर्यंत करण्याची मूभा महाराष्ट्र शासनाला दिली. त्याची घोषणा मु्ख्यमंत्र्यांनी केल्यानंतर नाफेडच्या खरेदी केंद्रांवर शेतक-यांची तोबा गर्दी सुरू झाली.
त्यामध्ये वाशिम येथील बाजार समितीमध्ये शुक्रवारी (12 मे) महिला शेतकरी आणि शेतकरी कन्याही नाफेडकडे टाकलेल्या तुरीचे टोकण मिळवण्यासाठी शुक्रवारी धडपड करताना दिसल्या.