रेगाव येथील महिलांचा दारूबंदीसाठी ‘एल्गार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 04:54 PM2019-08-19T16:54:02+5:302019-08-19T16:54:07+5:30
काही महिलांनी गावातील दारूबंदीसाठी ‘एल्गार’ पुकारत सोमवारी मालेगाव पोलिस स्टेशन गाठून रोष व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : लोकसंख्येच्या बाबतीत छोटेसे गाव असलेल्या तालुक्यातील रेगाव येथे हातभट्टीची दारू गाळणारे सात ते आठ अड्डे आहेत. यामुळे गावातील अनेकजण दारूच्या आहारी गेले असून दारूड्या पतीच्या, मुलांच्या त्रासाने महिला वैतागून गेल्या आहेत. हा त्रास असह्य झाल्याने अखेर काही महिलांनी गावातील दारूबंदीसाठी ‘एल्गार’ पुकारत सोमवारी मालेगाव पोलिस स्टेशन गाठून रोष व्यक्त केला.
रेगाव येथे ठराविक १० ते १५ लोक अवैधरित्या गावठी हातभट्टी दारूची विक्री करित आहेत. गावातच दारू सहज मिळत असल्याने कुटूंबप्रमुखासह युवकही दारूच्या आहारी गेले आहेत. यामुळे घराघरात दैनंदिन वाद होऊन अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून पोलिसांनी रेगाव येथील दारूचे अड्डे नेस्तनाबूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा व दोषींविरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महिलांनी ठाणेदारांकडून लाऊन धरली.
निवेदनकर्त्या महिलांमध्ये सखूबाई माघाडे, सुरेखा कांबळे, पुष्पा थिटे, रेखा थिटे, गौकर्णा कांबळे, मनिषा थिटे, रेखा मैघणे, अनुसया डाखोरे, लक्ष्मी झ्याटे, निर्मला मैघने, जानकाबाई पवार, वच्छलाबाई करवते यांच्यासह इतर महिलांचा सहभाग आहे.