‘लेखा’च्या कामकाजाचा तिढा अखेर सुटला!
By admin | Published: March 23, 2017 02:17 AM2017-03-23T02:17:32+5:302017-03-23T02:17:32+5:30
कर्मचा-यांच्या आंदोलनाची सांगता
वाशिम, दि. २२- शासनस्तरावर प्रलंबित विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषदेतील लेखा संवर्गीय कर्मचार्यांनी १५ मार्चपासून पुकारलेल्या लेखणी बंद आंदोलनाची यशस्वी सांगता बुधवारी करण्यात आली. यामुळे ऐन मार्च एण्डिंगमध्ये रखडलेली लेखाविषयक कामे आता पूर्ववत होतील, यात शंका नाही.
सहायक लेखा अधिकार्यांना शासकीय कर्मचार्यांप्रमाणे राजपत्रित दर्जा देण्यात यावा, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लेखा कर्मचार्यांनी विविध टप्प्यात आंदोलन पुकारले. १५ मार्चपासून लेखणी बंद आंदोलन सुरू असल्याने लेखाविषयक कामकाज ठप्प होते. वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील लेखा कर्मचार्यांची लेखणी बंद असल्याने विविध देयके रखडली होती. यामुळे निधी अखर्चित राहण्याची भीतीदेखील वर्तविली जात होती.
२२ मार्च रोजी मंत्रालयात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह मंत्र्यांसोबत चर्चा झाली आणि ग्रेड पे, पदोन्नतीची मागणी मान्य केल्याने तसेच वर्ग दोनच्या मागणीचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने संघटनेने आंदोलन मागे घेतले. वाशिम जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष रामानंद ढंगारे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या आंदोलनाला जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला होता. आमदार अमित झनक, जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी येवले यांच्यासह सर्व विभागप्रमुख, जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्यांनी आंदोलन मंडपाला भेटी देऊन लेखा कर्मचार्यांशी संवाद साधला होता. २२ मार्च रोजी मंत्रालयात यशस्वी चर्चा झाल्याने लेखणी बंद आंदोलन मागे घेण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष ढंगारे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.