वाशिम जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे रेंगाळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 02:39 PM2018-10-03T14:39:47+5:302018-10-03T14:40:15+5:30
वाशिम : ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे मंजूर आहेत. मात्र, स्थानिक यंत्रणेने निविदा प्रक्रियेत करून ठेवलेल्या घोळामुळे बहुतांश कामे पुढील मंजूरीअभावी रेंगाळली आहेत.
निविदा प्रक्रिया अडचणीत : १७ कामांचा प्रश्न ‘जैसे थे’
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे मंजूर आहेत. मात्र, स्थानिक यंत्रणेने निविदा प्रक्रियेत करून ठेवलेल्या घोळामुळे बहुतांश कामे पुढील मंजूरीअभावी रेंगाळली आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात १७ ठिकाणच्या रस्त्यांची कामे मंजूर आहेत. त्यामुळे प्रत्येक कामाची एक याप्रमाणे १७ निविदा काढून त्या मंजूर करणे आणि त्यानुसार कंत्राटदारांना कामे देवून ती पूर्ण करून घेणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी १७ कामांची विभागणी सोयिस्करपणे १३ निविदांमध्ये करून छोट्या कंत्राटदारांना वगळण्यासोबतच पात्रता नसलेल्या काही कंत्राटदारांच्या निविदा मंजूर केल्या. हा गंभीर प्रकार जिव्हारी लागल्याने यासंदर्भात काही कंत्राटदारांनी न्यायालयात धाव घेवून न्यायाची मागणी केली. यादरम्यान ८ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आणि त्यानंतर १४ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. चुकीच्या पद्धतीने कामकाज करणाºया मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील अधिकाºयांची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी लावून धरली. मात्र, यासंदर्भातील कामांची चौकशी अद्याप पूर्ण झाली नसल्याने कामे प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभागाचे कार्यकारी अभियंता गणोरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होवू शकला नाही.