वाशिम जिल्ह्यात दलित वस्तीची कामे मार्चपूर्वी पूर्ण करण्याची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 02:29 PM2018-03-06T14:29:32+5:302018-03-06T14:29:32+5:30
वाशिम : ग्रामीण भागातील दलित वस्तींमध्ये मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सन २०१७-१८ या वर्षात २४९ कामांसाठी साडे नऊ कोटींचा निधी मंजूर आहे. फेब्रुवारीअखेर ५० कामे पूर्ण झाली असून, उर्वरीत कामे मार्च २०१८ पूर्वी पूर्ण करण्याची कसरत संबंधित कंत्राटदारांना करावी लागणार आहे.

दलित वस्तींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी समाजकल्याण विभागातर्फे विविध कामे प्रस्तावित केली जातात. अनेक दलित वस्तींमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही तर काही दलित वस्तींमध्ये ये-जा करण्यासाठी सिमेंट रस्ता नाही तसेच पथदिवे, सभागृह आदी सुविधा नसल्याने दलित वस्त्या विकासापासून कोसो दूर आहेत. दलित वस्तींचा विकास साधण्यासाठी तसेच मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात एकूण २४९ कामांसाठी साडे नऊ कोटींचा निधी मंजूर आहे. सर्वाधिक कामे मालेगाव तालुक्यात ५२ आहेत. या कामांसाठी १ कोटी ९४ लाख २५ हजार रुपये निधी, वाशिम तालुक्यात एकूण ४० कामे असून एक कोटी ६७ लाख ६० हजार रुपये, रिसोड तालु्क्यात ४९ कामे असून दोन कोटी सहा लाख २० हजार रुपये, मंगरूळपीर तालुक्यात ४२ कामे असून एक कोटी ४२ लाख २० हजार रुपये, कारंजा तालुक्यात ३८ कामे असून एक कोटी ३९ लाख ५ हजार तर सर्वात मानोरा तालुक्यात २८ असून एक कोटी ४५ हजार रुपयांचा निधी मंजूर आहे. आतापर्यंत केवळ ५० कामे पूर्ण झाल्याने उर्वरीत कामे २५ दिवसात पूर्ण करण्याची कसरत संबंधित कंत्राटदारांना पूर्ण करावी लागणार आहे. विहित मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास देयक अदा केले जाणार नाही, अशा सूचना समाजकल्याण विभागाने दिल्या आहेत.