आचारसंहिता अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:50 AM2021-07-07T04:50:55+5:302021-07-07T04:50:55+5:30
वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेचे १४ गट व त्याअंतर्गत असलेल्या ६ पंचायत समित्यांच्या २७ गणांच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता २२ जूनपासून ...
वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेचे १४ गट व त्याअंतर्गत असलेल्या ६ पंचायत समित्यांच्या २७ गणांच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता २२ जूनपासून संबंधित क्षेत्रात लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपातीपणे व शांततेत पार पाडण्यासाठी आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असून, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले. नियोजन भवन येथे ५ जुलै रोजी आयोजित आचारसंहिता अंमलबजावणीविषयी सभेत ते बोलत होते.
यावेळी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, आचारसंहिताविषयक नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांचे विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. पोटनिवडणूक होत असलेल्या क्षेत्रांमधील शासकीय मालकीच्या जागा, इमारती, तसेच खासगी मालकीच्या जागा याठिकाणी आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करावी. आचारसंहिता लागू असलेल्या क्षेत्रात कोणतेही नवीन काम सुरू करणे, तसेच या क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही घोषणा करण्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होऊ शकते. त्यामुळे जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शासकीय यंत्रणांनी या अनुषंगाने विशेष खबरदारी घ्यावी. आचारसंहितेच्या अंमलबजावणीविषयी काही शंका असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खात्री करून घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही दिल्या.
------------------मतदान केंद्रांची आवश्यक दुरुस्ती
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने निवडणूक आचारसंहिता लागू असलेल्या क्षेत्रात एखादे अत्यावश्यक काम करावयाचे असल्यास संबंधित विभागाने लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार करावा. त्याविषयी स्पष्टीकरण मिळाल्यानंतरच असे काम करता येईल, तसेच ज्या मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे, अशा ठिकाणी मतदान केंद्रांची आवश्यक दुरुस्ती करण्याची कामे करण्याची परवानगी देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले.
----------------------आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास तक्रार करावी
पोलीस अधीक्षक परदेशी म्हणाले, आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, तसेच आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास निष्पक्षपाती कारवाई करावी. शासकीय इमारती, जागेमध्ये आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास संबंधित विभागाने पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल करावी. पोलीस विभागाकडून पुढील आवश्यक कार्यवाही केली जाईल.