कारंजातील वेशींचे काम लवकरच पूर्णत्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:33 AM2021-01-15T04:33:51+5:302021-01-15T04:33:51+5:30
कारंज्याच्या वैभवशाली चारही वेशी या ऐतिहासिक आहेत. अशा स्थितीत शहरातील पूर्व दिशेस दारव्हा वेस, पश्चिमेस पोहा वेस, उत्तरेस दिल्ली ...
कारंज्याच्या वैभवशाली चारही वेशी या ऐतिहासिक आहेत. अशा स्थितीत शहरातील पूर्व दिशेस दारव्हा वेस, पश्चिमेस पोहा वेस, उत्तरेस दिल्ली वेस, दक्षिणेस मंगरूळ वेस या ऐतिहासिक ठेवा असलेल्या वेशी शहराला लाभलेल्या आहे. काही काळाअगोदर या चारही वेशींची अवस्था शिकस्त झाल्यामुळे अत्यंत दयनीय होती. या चारही वेशीतून नागरिकांचे व वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन असल्यामुळे व काही वेशींच्या बाजूला नागरी वस्ती असल्यामुळे या शिकस्त वेशी कधीही कोसळून जीवित व वित्तीय हानीसुद्धा संभवत होती. माजी आमदार प्रकाश डहाके यांनी चारही वेशींच्या सर्वस्वी दुरुस्तीचा प्रकल्प हाती घेतला. इ.स.२०१२-१३ मध्ये यासाठी शासनाकडून निधी महत्प्रयासाने खेचून आणला. त्यातून मंगरूळ वेशीचे काम पूर्ण झाले व ती नागरिकांच्या आवागमनास आता जनसेवेत रुजू झाली आहे. पोहा वेशीचे काम ९० टक्के पूर्ण झाले. परंतु, काही निधीअभावी रखडले तसेच दिल्ली वेशीचे कामही निधीअभावी रखडले आहे. अशा स्थितीत नागरिकांनी माजी आमदार प्रकाश डहाके यांच्याकडे ही कामे पूर्ण होण्यासाठी धाव घेतली. अखेर १३ जानेवारी रोजी पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालिका जया वाहाणे व या विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वेशींची पाहणी केली. यातील दिल्ली वेशीच्या कामाचे भूमिपूजन स्थानिक रहिवासी मुमताज टेलर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोपाल पाटील भोयर, राजेश कश्यप, आशिष गावंडे, नयामत मिर्झा, अक्षय लोटे, नगरसेवक नितीन गढवाले, माजी न.प. उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण कश्यप, कंत्राटदार अशोक काकडे यांच्यासह आझाद हिंद व्यायामशाळेच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
......................
पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक
कारंजा - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात पुरातत्त्व विभागाचे अधिकारी व माजी आमदार डहाके यांची बैठक झाली. सन २०१२-१३ मध्ये १ कोटी १० लाखांचा निधी प्राप्त झाला होता. परंतु, त्यानंतर दुरुस्ती अंदाजपत्रक वाढल्याने या कामासाठी ३ कोटी ४० लाखांच्या वाढीव निधीचा प्रस्ताव पुरातत्त्व विभागाकडे सादर करण्यात आल्याची माहिती मिळाली. पोहा वेस दुरुस्तीसाठी लागणाऱ्या १५ लाख रुपयांच्या निधीचाही समावेश असल्याचे सांगितल्या गेले. सदर निधी अद्याप मंजूर झाला नसला तरी जो निधी सध्या उपलब्ध आहे, त्यातून दिल्ली वेस दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. सदर वेशींच्या दुरुस्तीसाठी या वेशी येत्या सहा महिन्यांत तरी नागरिकांच्या आवागमनाकरिता खुल्या राहणार नाही व लवकरच कारंजातील पोहा वेस व दिल्ली वेस यांचे काम पूर्णत्वास जाईल, अशी माहिती पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या वेशीच्या वाढीव निधीसाठी सांस्कृतिक मंत्रालय व पुरातत्त्व विभागाकडे अधिक प्रयत्न करून वाढीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी माजी आमदार प्रकाश डहाके प्रयत्न करीत आहेत.