Video - वाशिम जिल्ह्यात महामार्गाच्या कामात प्रदुषण नियंत्रणाला बगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 01:29 PM2018-12-21T13:29:37+5:302018-12-21T14:17:04+5:30
वाशिम: जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामाच्या अंदाजपत्रकानुसार प्रदुषण नियंत्रणासाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामाच्या अंदाजपत्रकानुसार प्रदुषण नियंत्रणासाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत आहे. गिट्टी क्रशर आणि रस्त्यावरील सपाटीकरणाच्या कामांत पाण्याचा वापर होत नसल्याने मोठ्या प्रमाणात धुळ उडून ती हवेत पसरत असल्याने पर्यावरण दुषित होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बांधकाम कार्ये, खराब रस्ते व जीवाश्म इंधनांचे ज्वलन, धुळीच्या (पार्टीक्युलेट मॅटर) प्रदूषणासाठी अर्थात वायू प्रदुषणासाठी जबाबदार आहेत. या बाबी लक्षात घेऊन प्रदुषण नियंत्रण मंडळाच्यावतीने मोठ्या प्रमाणात होणाºया बांधकाम कार्यासाठी प्रदुषण नियंत्रणाची नियमावली निश्चित करण्यात आली आहे. यात मोठमोठ्या वसाहती, इमारती आणि रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी ही नियमावली घालून देण्यात आली आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने चार मार्गांचे काम करण्यात येत असून, या कामांत मोठ्या प्रमाणात मुरु म, गिट्टी आदि गौण खनिजांचा वापर करण्यात येत आहे. या गौण खनिजांचा वापर करताना धुळ उडू नये म्हणून विशेष सुचना अंदाजपत्रकात नमूद करण्यात आलेल्या आहेत. यात रस्त्याच्या कामात मुरुमाचा वापर करताना पर्यावरणीय अनुमतीनुसार दबाई करताना पाण्याचा वापर करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय गिट्टी फोडण्यासाठी वापरण्यात येणाºया क्रशर मशीनची स्क्रीनवर प्लास्टिक आवरण, तसेच गिट्टी क्रश करण्यासाठी वापरण्यात येणाºया दगडांची धुळ, माती काढणे आणि हे दगड फोडून गिट्टी करताना धुळ उडू नये म्हणून त्यावर पाणी टाकणे आवश्यक आहे; परंतु मंगरुळपीर-महान मार्गावर सुरू असलेल्या १६१-ए या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाशिवाय इतर कोणत्याही मार्गावर या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पर्यावरण प्रदुषित होऊन नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.
धुळीमुळे होणारे प्रदुषण घातक
धुळीच्या प्रदूषणामुळे हवा, मोठया प्रमाणात बाष्प धारण करते तेव्हा गर्द धुके निर्माण होते. नित्कृष्ट दर्जाच्या हवेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो. प्रामुख्याने, वायु प्रदूषणाचा, शरीराच्या श्वसन यंत्रणेवर आणि हृदय रक्त यंत्रणेवर परिणाम होतो. वायु प्रदूषणामुळे दीर्घ कालीन आरोग्याच्या समस्या उदभवतात. वायु प्रदूषणामुळे उद्भवलेल्या आरोग्य समस्येने, श्वसन क्रियेत अडचणी येणे, दमा, खोकला यांसारखे श्वसन व हृदयासंबंधीची स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या कामातून उडणाºया धुळीमुळे रात्री मोठ्या प्रमाणात धुके तयार होऊ वाहनधारकांना अडचणी येत आहेत.
आठ हजार झाडांची कत्तल
जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी विविध मार्गांवरील ७६६३ झाडे तोडण्याचे आदेश वनविभागाने जारी केले होते. त्यातील ७० टक्क्यांवर झाडांची कत्तलही झाली. त्यातील ९० टक्के झाडे ही ५० वर्षांहून अधिक काळाची होती. आता पर्यावरण प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेली झाडे आधीच तोडण्यात आल्यानंतर आता राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने रस्त्यांच्या कामांमुळे पर्यावरण दुषित होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे; परंतु तसे होताना दिसत नाही.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी तयार अंदाजपत्रकात प्रदुषण नियंत्रणासंबंधी सुचना आहेत. यात रस्त्याच्या कामासाठी पर्यावरणीय अनुमतीनुसार पाणी टाकणे आणि गिट्टी क्रश करताना कोणत्याही प्रकारे धुळ उडू नये म्हणून उपाय आवश्यक आहेत. या नियमांचे पालन न करणाºया कंत्राटदारांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- संजय पाटील
प्रदुषण नियंत्रण अधिकारी अमरावती