राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासी निवाऱ्यांची कामे अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:38 AM2021-03-08T04:38:29+5:302021-03-08T04:38:29+5:30
वाशिम जिल्ह्यात अकोला-हिंगोली, मालेगाव-मेहकर, अकोला-आर्णी, हिंगोली-यवतमाळसह इतर एका मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आणि तीन वर्षांपूर्वी या महामार्गांच्या ...
वाशिम जिल्ह्यात अकोला-हिंगोली, मालेगाव-मेहकर, अकोला-आर्णी, हिंगोली-यवतमाळसह इतर एका मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आणि तीन वर्षांपूर्वी या महामार्गांच्या कामाला सुरुवातही झाली. त्यापैकी हिंगोली-यवतमाळ या महामार्गावरील वाशिम-कारंजा, अकोला-आर्णी महामार्गावरील वनोजा-मंगरुळपीर-मानोरा या मार्गांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, तर मालेगाव-मेहकर मार्गाचेही काम अंतिम टप्प्यात आहे. महामार्गाचे कामे करताना पूर्वीचे प्रवासी निवारे उद्ध्वस्त झाल्याने, तर काही ठिकाणी ते पाडावे लागल्याने कंत्राटदार कंपन्यांकडून अंदाजपत्रकानुसार लोखंडी प्रवासी निवा-यांची उभारणी सुरू करण्यात आली. त्यात वाशिम-कारंजादरम्यानच्या अंतरातील प्रवासी निवा-यांचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावरील प्रवाशांना उन्हापासून थोडा दिलासा मिळत आहे. तथापि, इतर मार्गावर गावाच्या, शहराच्या मुख्य ठिकाणी सुरू केलेली अनेक प्रवासी निवा-यांची कामे अर्धवटच आहेत, तर काही ठिकाणी अद्याप सुरुवातच करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांना वाहनांची प्रतीक्षा करण्यासाठी रखरखत्या उन्हात उभे राहावे लागत आहे.
--------------
बालक, वृद्धांना अधिक त्रास
राष्ट्रीय महामार्गावर पूर्वीचे प्रवासी निवारे शिकस्त झाल्याने प्रवाशांना पूर्वी वृक्षांचा आधार होत असे; परंतु राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी सर्वच मुख्य रस्त्यांवरील मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले, तर अनेक गावांच्या ठिकाणी अद्याप नव्या प्रवासी निवा-यांचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे प्रवाशांना रखरखत्या उन्हात वाहनांची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यात बालके आणि वृद्धांना याचा अधिक त्रास होत असून, त्यांना उन्हाचा फटकाही बसण्याची शक्यता आहे.
----------------