साठवण तलावाचे काम रखडलेलेच!
By admin | Published: May 30, 2017 01:33 AM2017-05-30T01:33:29+5:302017-05-30T01:33:29+5:30
शेतकरी नाराज: सात वर्षांपासून जमीन अधिग्रहणाची प्रकिया अपूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
लोहगाव महागाव : कारंजा तालुक्यातील लोहगाव महागाव येथे सात वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलले साठवण तलावाचे काम विविध अडचणींमुळे अद्यापही पूर्ण झाले नाही. एकिकडे शासन जलयुक्त शिवार अभियान राबविते, तर दुसरीकडे सुरू केलेल्या जलप्रकल्पांचे कामही पूर्ण करीत नाही. त्यामुळे शासनाचे धोरण नेमके आहे तरी कोणते ते समजणे कठीण होऊन बसले आहे.
ग्रामीण परिसरात पाण्याची टंचाई भासू नये, त्याशिवाय सिंचन क्षेत्रात वाढ होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधला जावा. या उद्देशाने शासन कोट्यवधी रुपये खर्चून ठिकठिकाणी बांध आणि साठवण तलावाची निर्मिती करीत आहे. जलयुक्त शिवार अभियानासारख्या योजना सुरू करीत आहे. त्यासाठी अब्जावधी रुपयेसुद्धा खर्च करीत आहे; परंतु त्या योजनांची प्रभावी अंमल बजावणी होत नसल्यामुळे शासनाच्या अब्जावधी रुपयांचा निधीचा अपव्यय होत असल्याचे दिसत आहे. असेच एक उदाहरण कारंजा तालुक्यातील लोहगाव महागाव येथे पाहायला मिळत आहे. लोहगाव महागाव येथे साधारण पाच वर्षांपूर्वी लघू सिंचन जलसंधारण विभागामार्फत साठवण तलावाला मंजुरी मिळाली. या तलावामुळे लोहगाव महागाव परिसरातील जवळपास १३८ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार. या तलावासाठी आवश्यक जमिनही शेतकऱ्यांकडून अधिग्रहीत करण्यात आली. तलावाच्या कामाचे भूमीपुजन तत्कालीन आमदार प्रकाश डहाके यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता आणि भूमीपुजनानंतर पाच ते सहा महिन्यांतच या तलावाचे काम सुरू झाले. हे काम सुरळीतपणे चालु राहिल्यास मजुरांना रोजगार मिळेल आणि शेती सिंचनाचाही प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा लोहगाव महागाव परिसरातील शेतकरी आणि मजूर वर्गाकडून व्यक्त करण्यात येत होती; परंतु या तलावाचे काम गत दोन वर्षांपासून बंद पडले आहे. यंदा कारंजा तालुक्यावर दुष्काळी स्थिती ओढवल्याने कृषी उत्पन्नात मोठी घट झाली, तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही बिकट झाला असून, पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झालेली आहे. लोहगाव साठवण तलाव वेळेत पूर्ण झाला असता, तर लोहगाव परिसरातील जनतेला उपरोक्त समस्यांचा सामना करावा लागला नसता. तथापि, तसे झाले नाही. त्यामुळे आज रोजी परिसरात सिंचनासह चारा आणि पिण्याच्या पाण्याचीही समस्या जाणवत आहे. त्यामुळे शासनाच्या वेळकाढून धोरणाबाबत परिसरातील जनता व शेतकरी वर्गांत नाराजीचे वातावरण आहे. संबंधितांनी याची जाणीव ठेवून या साठवण तलावाचे काम सुरू करून ते त्वरीत पूर्ण करावे, अशी मागणी शेतकरी व जनतेकडून होत आहे.
लोहगाव महागावच्या तलावासाठी आवश्यक जमिन अधिग्रहण प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. अधिग्रहणाची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. याबाबत सुधारित अंदाजपत्रक तयार करून त्याच्या प्रशासकीय मान्यतेचाही प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच या तलावाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.
-अमोल पाटील
उपविभागीय अभियंता, लघू पाटबंधारे उपविभाग कारंजा लाड