कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचे काम ‘मिशन मोड’वर; एका महिन्याची डेडलाईन
By संतोष वानखडे | Published: November 6, 2023 07:06 PM2023-11-06T19:06:54+5:302023-11-06T19:07:41+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा : एका महिन्याची डेडलाईन
संतोष वानखडे
वाशिम : मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याची कार्यवाही करण्यासाठी यंत्रणांनी अभिलेख्यांची तपासणी करावी, संबंधित यंत्रणांनी सन १९४८ ते १९६७ या कालावधीतील अभिलेखामधील कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचे काम मिशन मोडवर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी सोमवारी (दि.६) वाशिम येथील आढावा बैठकीत दिले.
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्यासाठी न्या. संदिप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या स्विकृत केलेल्या पहिल्या अहवालाच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला. सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बुवनेश्वरी म्हणाल्या, ज्या-ज्या विभागाकडे कुणबी जातीची नोंद असलेले तत्कालीन कागदपत्रे असतील ते शोधून ठेवावे. या सर्व नोंदी एक महिन्याच्या आत संबंधित यंत्रणांनी एकत्रिक कराव्यात. सर्व नोंदींची माहिती काळजीपूर्वक संकलीत करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
नियंत्रण कक्ष स्थापन होणार
कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याच्या अनुषंगाने जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून संबंधित विभागाचा एक कर्मचारी या कक्षासाठी नियुक्त करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दररोज सायंकाळी ६ वाजता संबंधित विभागाने संकलीत केलेली दररोजची माहिती उपलब्ध करु द्यावी. कुणबी जात प्रमाणपत्र किती जणांना दिले तसेच कुणबी-मराठा व मराठा-कुणबी ह्या नोंदी असलेले प्रमाणपत्र किती जणांना दिले हे सुध्दा शोधावे, अशा सूचनाही बुवनेश्वरी एस. यांनी दिल्या.