पश्चिम वर्हाडात सर्वाधिक निकृष्ट माती अकोल्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:37 AM2018-01-18T00:37:14+5:302018-01-18T00:42:42+5:30
वाशिम : जलसंपदा विभागाकडून उभारण्यात येणार्या धरणांसाठी बुडित क्षेत्रात चांगल्या दर्जाची माती आणि पक्के दगड उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, अकोट, तेल्हारा यासह इतर काही भाग हा खारपाणपट्टय़ाने व्यापला असल्याने मातीदेखील निकृष्ट आहे.
सुनील काकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जलसंपदा विभागाकडून उभारण्यात येणार्या धरणांसाठी बुडित क्षेत्रात चांगल्या दर्जाची माती आणि पक्के दगड उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, अकोट, तेल्हारा यासह इतर काही भाग हा खारपाणपट्टय़ाने व्यापला असल्याने मातीदेखील निकृष्ट आहे. याशिवाय ६0 फूट खोल खोदूनही पक्के दगड आढळत नसल्याने पश्चिम वर्हाडातील इतर जिल्हय़ांच्या तुलनेत अकोल्यात धरण उभारण्यासाठी अधिक निधी लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अकोला येथे जलसंपदा विभागाची स्वतंत्र माती परीक्षण प्रयोगशाळा असून, त्या ठिकाणी माती नमुने तपासण्याकरिता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या प्रयोगशाळेत विविध ठिकाणी धरण उभारण्यापूर्वी बुडित क्षेत्रातील मातीवर परीक्षण करण्यात आले असता, ती निकृष्ट दर्जाचे आढळून आले. याशिवाय ५0 ते ६0 फूट खोल खोदल्यानंतरही पक्के दगड मिळत नसल्याने नजिकच्या शेगाव, खामगाव येथून हे साहित्य आणावे लागत आहे. यामुळे धरणाची ‘इस्टीमेट कॉस्ट’ वाढते. तद्वतच धरण उभारण्याकरिता अधिक वेळ लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जलसंपदा प्रयोगशाळेस ‘आयएसओ’!
‘इंटरनॅशनल मॅनेजमेंट अँक्रीडिएशन बोर्ड’, सिंगापूर अंतर्गत कार्यरत जीओटेक ग्लोबल सर्टिफिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अधिकार्यांनी ७ व ८ जानेवारीला अकोला येथील जलसंपदा विभागाने नोंदविलेल्या माती नमुन्यांची तपशीलवार निरीक्षणे केली. यात गुणवत्ता मानकांचे पालन करून योग्य अंमलबजावणी झाल्याने माती चाचणी उपविभागीय कार्यालयास ‘आयएसओ ९00१:२0१५’ मानांकनाने गौरविण्यात आले. यासंदर्भातील प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती जलसंपदाचे कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांनी बुधवारी ‘लोकमत’ला दिली.
जलसंपदाच्या अकोला येथील विभागीय माती परीक्षण प्रयोगशाळेत वर्हाडातील धरणांच्या बुडित क्षेत्रात असलेल्या माती नमुन्यांची तपासणी केली जाते. त्यात अकोला जिल्ह्यातील माती तुलनेने निकृष्ट दर्जाची असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय धरणासाठी आवश्यक ठरणारे दगडही आढळत नसल्याने धरणांच्या ‘इस्टिमेट कॉस्ट’मध्ये आपसूकच वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
- जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, अकोला.