शिरपूर जैन येथे १७ व १८ फेब्रुवारीला कुस्त्यांची दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 04:22 PM2018-02-08T16:22:46+5:302018-02-08T16:24:10+5:30
शिरपूर जैन: येथील जानगीर महाराज संस्थानच्या भव्य मैदानावर महाशिवरात्रीचे औचित्य साधून निकाली कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे.
शिरपूर जैन: येथील जानगीर महाराज संस्थानच्या भव्य मैदानावर महाशिवरात्रीचे औचित्य साधून निकाली कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १७ आणि १८ फेब्रुवारीला होणाऱ्या या कुस्तीच्या दंगलीचे आयोजन शिरपूर येथील ओंकारगीर कुस्तीगीर मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
शिरपूर येथे दरवर्षी महाशिवरात्रीच्या औचित्यावर कुस्त्यांची दंगल भरविण्यात येते. यंदा ही दंगल १७ आणि १८ फेब्रुवारीला आयोजित केली असून, या १७ फेब्रुवारीला होणाऱ्या दंगलीसाठी १५ हजारांपासून १ हजार रुपयांपर्यंत, तर १८ फेबु्रवारीला होणाऱ्या दंगलीसाठी ७१ हजार रुपयांपासून ४१०० रुपयांपर्यंत मिळून लाखो रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. या दंगलीचे उद्घाटन जानगीर महाराज संस्थानचे मठाधिपती प.पु. महेशगीर बाबा यांच्या हस्ते आणि शिरपूरचे ठाणेदार हरीष गवळी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. १८ फे ब्रुवारीच्या कार्यक्रमाला प्रसिद्ध मल्ल पै. असलम काझी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्पर्धेत पंच म्हणून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे दत्ताभाऊ दुबे, युवराज पाटील वाघ आणि मनोज पवार, तर समालोचक म्हणून कोल्हापूरचे शंकरअण्णा पुजारी, तसेच पंढरपूरचे धनंजय मदने राहणार आहेत.