आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर चढाईकरिता यश इंगोले रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:46 AM2021-08-14T04:46:29+5:302021-08-14T04:46:29+5:30
वाशिम अर्बन बँकेत सेवारत असलेले मारोती इंगोले यांचा मुलगा यश इंगोले याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रिसोड येथील अग्रगण्य व्यापारी ...
वाशिम अर्बन बँकेत सेवारत असलेले मारोती इंगोले यांचा मुलगा यश इंगोले याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रिसोड येथील अग्रगण्य व्यापारी तथा अजंता फार्मा लिमिटेड औरंगाबादचे अध्यक्ष मन्नालाल अग्रवाल यांनी रोख पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. आगामी १५ ऑगस्ट रोजी आफ्रिका खंडातील किलिमांजारो या सर्वोच्च शिखरावर भारतीय ध्वज फडकविण्याचे स्वप्न यशने बाळगले आहे. यश याने हिमाचल प्रदेशातील मनाली येथील अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग ॲण्ड अलाइड स्पोर्ट्स या संस्थेतून गिर्यारोहणाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. प्रशिक्षणेदरम्यान त्याने १५ हजार फूट यशस्वी चढाई केली असून, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील ५४०० फूट असलेले कळसूबाई या सर्वोच्च शिखरावर दोनवेळा यशस्वी चढाई केली आहे, तर सह्याद्री पर्वतरांगांमधील १८ किल्ले व ३ समुद्री किल्ल्यावरसुद्धा त्याने चढाई केली आहे. वाशिम जिल्ह्याकरिता अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या यशने जिल्ह्याचा गौरव वाढविला असल्याचे मनोगत अजंता फार्मा लिमिटेडचे अध्यक्ष मन्नालाल अग्रवाल यांनी व्यक्त केले. यश हा आंतरराष्ट्रीयस्तरावर पताका रोवून देशाचे नावलौकिक करेल, असा विश्वास जिल्हावासी बाळगून आहेत.
-------
जिल्ह्याचे भूषण
१५ ऑगस्ट रोजी आफ्रिका खंडातील किलिमांजारो या सर्वोच्च शिखरावर भारतीय ध्वज फडकावून यश जिल्ह्याचे नावलाैकिक करणार आहे. ताे जिल्ह्याचे भूषण असल्याचे मनाेगत मन्नालाल अग्रवाल यांनी व्यक्त केले.