यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ निम्म्या फेऱ्या पूर्ण; संजय देशमुख ५३,११६ मतांनी पुढे!
By सुनील काकडे | Updated: June 4, 2024 14:54 IST2024-06-04T14:52:58+5:302024-06-04T14:54:32+5:30
Yavatmal- Washim Lok Sabha Election Result 2024 : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीचा निकाल जाहीर होत आहे.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ निम्म्या फेऱ्या पूर्ण; संजय देशमुख ५३,११६ मतांनी पुढे!
सुनील काकडे, वाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीचा निकाल जाहीर होत आहे. दरम्यान, दुपारी २ वाजतापर्यंत एकूण ३० पैकी १५ फेऱ्यांचे निकाल हाती आले असून त्यात ५३ हजार ११६ मतांनी महाविकास आघाडीचे संजय देशमुख हे पुढे आहेत. त्यांना आतापर्यंत ३ लाख ३२ हजार ७१३ मते मिळाली असून महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी २ लाख ७९ हजार ५९७ मते घेतली आहेत. पुढच्या १५ फेऱ्यांमध्ये काय उलटफेर होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक खऱ्याअर्थाने आगळ्यावेगळ्या स्वरूपाची झाली. एरव्ही शिवसेनेच्या विरोधात काॅंग्रेस उभी ठाकत असताना यंदा मात्र शिंदेसेना आणि उद्धवसेना एकमेकांसमक्ष उभी राहिली. शिंदेसेनेच्या राजश्री पाटील यांच्या पाठीशी भाजपा, रा.काॅं. (अजित पवार गट) आणि शिंदेसेनेची ताकद होती; तर उद्धवसेनेचे उमेदवार यांना काॅंग्रेस, रा.काॅं. (शरद पवार गट) आणि उद्धवसेनेच्या पाठीराख्यांची भक्कम साथ मिळाली.
दरम्यान, निवडणूकीचा निकाल जाहीर होत असून आतापर्यंत १५ फेऱ्यांमध्ये उद्धवसेनेच्या संजय देशमुख यांनी भक्कम आघाडी घेत शिंदेसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांना ५३ हजार ११६ मतांनी पिछाडीवर टाकले आहे. पुढच्या १५ फेऱ्यांमध्ये कोण पुढे जाणार, कोण मागे येणार, याकडे मतदार लक्ष ठेवून आहेत.