प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत यंदा ३७४९ घरकुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 11:52 AM2020-12-18T11:52:17+5:302020-12-18T11:52:25+5:30
Pradhan Mantri Awas Yojana अनुसूचित जमातीच्या कुटुंबांसाठी ११०, तर इतर प्रवर्गातील कुटुंबांसाठी ३७४९ घरकुलांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) वाशिम जिल्ह्यास २०२०-२१ या वर्षाकरिता ३७४९ घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यात अनुसूचित जमातीच्या कुटुंबांसाठी ११०, तर इतर प्रवर्गातील कुटुंबांसाठी ३७४९ घरकुलांचा समावेश आहे. या उद्दिष्टानुसार गटविकास अधिकाऱ्यांना उपलब्ध कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीतील शिल्लक पात्र लाभार्थी संख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायतनिहाय उद्दिष्ट वाटपाची कार्यवाही करावी लागणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील बेघर कुटुंबांना घरकुल देण्यासाठी ग्रामीण गृहनिर्माण, राज्य व्यवस्थापन कक्षाच्या संचालकांनी ५ ऑगस्ट २०२० रोजी पाठविलेल्या पत्रानुसार ३५५ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. ग्रामीण गृहनिर्माण, राज्य व्यवस्थापन कक्षाच्या संचालकांनीच ६ ऑक्टोबर रोजी पाठविलेल्या पत्रानुसार त्यात अनुसूचित जमातीसाठी ११०, तर इतर प्रवर्गाकरिता २४५ मिळून एकूण ३५५ घरकुलांचे वाटपही करण्यात आले आहे. आता ग्रामीण गृहनिर्माण, राज्य व्यवस्थापन कक्षाकडून १५ ऑक्टोबर रोजी प्राप्त पत्रानुसार जिल्ह्यासाठी शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुधारित उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यात इतर प्रवर्गाचे ३३९४ एवढे वाढीव उद्दिष्ट असून, यापूर्वी प्राप्त ३५५ मिळून आता या योजनेंतर्गत जिल्ह्यात ३७४९ घरकुलांचे वाटप करण्यात येणार आहे. या उद्दिष्टानुसार जिल्ह्यातील सहा गटविकास अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीतील शिल्लक पात्र लाभार्थी संख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायतनिहाय उद्दिष्ट वाटपाची कार्यवाही करावी लागेल.
दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ५ टक्के
वाशिम जिल्ह्यास प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या घरकुल उद्दिष्टाच्या ५ टक्के घरकुले दिव्यांग लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार असून, या संदर्भातील प्रस्ताव प्राधान्याने सादर करण्याचे निर्देश ग्रामीण गृहनिर्माण, राज्य व्यवस्थापन कक्षाने दिले आहेत.जिप. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी या संदर्भात सर्व पंचायत समित्यांना पत्रही पाठविले असून, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या मार्गदर्शनात पंचायत समितीस्तरावर प्रतिक्षा यादीसह इतर लाभार्थींची निवड करण्याची तयारी सुरू झाली आहे.
ग्रामीण गृहनिर्माण, राज्य व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त पत्रानुसार जिल्ह्यास प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ३७४९ घरकुलांचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टानुसार ग्रामपंचायत निहाय उद्दिष्ट निश्चित करून प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना सर्व गटविकास अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.
-डॉ. विनोद वानखडे, प्रभारी, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जि.प. वाशिम