यंदा प्रथमच कोरडी पडली तपोवनची ‘बारव’!
By admin | Published: May 20, 2017 01:42 AM2017-05-20T01:42:38+5:302017-05-20T01:42:38+5:30
भाविकांमध्ये कुतूहल : जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता घटल्याचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : पौराणिक महत्त्व प्राप्त असलेल्या जिल्ह्यातील तपोवन (ता.मालेगाव) येथील ‘बारव’ यापूर्वी कधीच कोरडी पडली नाही. मात्र, यंदाच्या उन्हाळ्यात ही ‘बारव’ आणि त्याला लागून असलेल्या विहिरीत थेंबभरही पाणी शिल्लक नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रामायण कालखंडात सीतेने तपोवनच्या ‘बारव’जवळ थांबून आंघोळ केली होती, अशी आख्यायिका असलेल्या मालेगाव तालुक्यातील तपोवनमध्ये महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. तेथे दर महाशिवरात्रीला तसेच श्रावण महिन्यात महिनाभर भाविकांची दर्शनासाठी अक्षरश: रीघ लागते. मंदिराला लागूनच पाण्याची मोठी ‘बारव’ आहे. त्यात स्नान केल्याने पुण्य मिळत असल्याची भाविकांची दृढ श्रद्धा आहे. मात्र, यावर्षीच्या उन्हाळ्यात सदर ‘बारव’मधील पाणी पूर्णत: आटले आहे. ही घटना यापूर्वी कधीच अनुभवली नाही, असे परिसरातील वयोवृद्ध मंडळी सांगतात.
तथापि, पावसाळ्यात जमिनीवर कोसळणारे पाणी जमिनीत मुरण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत असल्याने जमिनीखालची पाण्याची पातळी घटत चालली आहे. त्यामुळेच ही स्थिती उद्भवल्याचा अंदाज भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक बलवंत गजभिये यांनी वर्तविला आहे.