कसदार शेतातून पिकलेली पिवळी हळद झाली काळी; अवकाळी पावसाचा जबर फटका
By सुनील काकडे | Published: May 5, 2023 07:09 PM2023-05-05T19:09:37+5:302023-05-05T19:09:54+5:30
सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील शिरपूर (ता.मालेगाव) परिसरातील असंख्य शेतकरी हळद लागवडीकडे वळले आहेत.
वाशिम: सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील शिरपूर (ता.मालेगाव) परिसरातील असंख्य शेतकरी हळद लागवडीकडे वळले आहेत. मात्र, यंदा हळदीच्या दराने निच्चांक गाठण्यासह अवकाळी पावसाचा जबर फटका बसत शेतात पिकलेली हळद चक्क काळी पडली आहे. या हळदीला अगदीच कमी दर मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
गेल्या काही वर्षांपासून खरीप आणि रब्बी हंगामातील पारंपरिक पिकांवरच विसंबून न राहता नगदी व हमखास पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळद लागवडीकडे शिरपूर परिसरातील असंख्य शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. दरम्यान, २०२१ मध्ये हळदीला अपेक्षेपेक्षा अधिक दर मिळाला. तीच स्थिती कायम राहण्याची आशा बाळगून शेतकऱ्यांनी हळदीचे सरासरी क्षेत्र वाढविले; मात्र २०२२ मध्ये हळदीचे दर मोठ्या प्रमाणात गडगडले. हे चित्र सध्याही कायम आहे. अशातच अधूनमधून होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतातील हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
उकडलेली हळद सडतेय; शेतकरी हतबल
शेतात पूर्ण वाढ झालेली हळद काढून घेण्यात आली. उकडल्यानंतर सुकवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र, अवकाळी पाऊस आणि ढगाळी वातावरणामुळे प्रखर सूर्यप्रकाश मिळणे अशक्य झाल्याने हळद सडून काळी पडत आहे. शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
हळद उकडून सुकवायला ठेवली जात आहे; मात्र यादरम्यान अचानक पाऊस कोसळत असल्याने हळद सडायला लागली आहे. शासनाने तत्काळ सर्वे करून इतर पिकांप्रमाणे हळदीलाही नुकसान भरपाई द्यायला हवी. - कैलास गावंडे, हळद उत्पादक शेतकरी
मी गेल्या काही वर्षांपासून हळदीचे उत्पादन घेत आहे. फायदा देखील बऱ्यापैकी होत आहे; मात्र यावर्षी सतत पाऊस सुरू असल्याने हळद सुकवायला संधीच मिळणे अशक्य झाले आहे. परिणामी, हळद काळी पडून सडत आहे. - संजय देशमुख, हळद उत्पादक शेतकरी.