होय ! आमच्याकडून प्रत्येकी १२०० रुपये घेतले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:47 AM2021-08-17T04:47:48+5:302021-08-17T04:47:48+5:30
धनंजय कपाले वाशिम : ‘ होय ! आमच्याकडून रजिस्टरसाठी प्रत्येकी १२०० रूपये घेतलेत,’ असा लेखी जबाब दस्तुरखुद्द आशा स्वयंसेविकांनी ...
धनंजय कपाले
वाशिम : ‘ होय ! आमच्याकडून रजिस्टरसाठी प्रत्येकी १२०० रूपये घेतलेत,’ असा लेखी जबाब दस्तुरखुद्द आशा स्वयंसेविकांनी तपास अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डावरे यांचेकडे एप्रिल महिन्यातच दिला. याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशावरून आशा स्वयंसेविकाकडून प्रत्येकी १२०० रूपये जमा केल्याचे गटप्रवर्तकांनीही लेखी लिहून दिले आहे. असे प्रबळ पुरावे मिळूनही वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात वसुलीचा गोरखधंदा करणाऱ्यावर कोणतीच कार्यवाही का करत नाहीत, हा प्रश्न मात्र अनाकलनीयच आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हाभरात ९०० च्या वर आशा स्वयंसेविका आहेत. या आशा स्वयंसेविकांकडून विविध कारणे समोर करून पैसे उकळण्याचा गोरखधंदा गेल्या तीन वर्षापासून चांगलाच फोफावला आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत खासगी लोकांचाही समावेश असल्याची खात्रीलायक माहिती लोकमतच्या हाती ‘पुराव्यानिशी’ आली आहे. आशा स्वयंसेविकांकडून प्रत्येकी १२०० रुपये वसुली केल्याच्या गोरखधंद्याचे कारनामे जिल्हा परिषदेच्या सभागृहातही गाजले होते. यावेळी काही लोकप्रतिनिधींनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेसह उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना वाशिमच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात आशा स्वयंसेविकांकडुन प्रत्येकी १२०० रुपये वसूल केल्याचेही निष्पन्न झाले. हे सुध्दा निदर्शनास आणुन दिले आहे. तरिसुध्दा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्यापही यावर कोणतीच कार्यवाही केली नाही.
दरम्यानच्या काळात या प्रकरणाची दोन वेळा चौकशी झाली. दोन वेळेच्या चौकशीत काय आढळून आले? हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. असे असले तरी वाशिमच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कार्यवाही करणे अपेक्षित होते.
कोट: आशांकडून अनधिकृत वसुलीबाबत जून - जुलै महिन्यात चौकशी केली. वाशिम तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचे लेखी बयाण घेतले आहे. या तपासात आशाकडून अवैधरित्या वसुली करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. तसा संपूर्ण अहवाल मागील महिन्यातच मुख्याधिकारी यांचेकडे पाठविला आहे. पुढील कार्यवाही मुख्याधिकारी करतील.
डॉ. राजेश डावरे
तालुका आरोग्य अधिकारी, वाशिम