‘आधार अपडेट’साठी तासन्तास थांबावे लागते रांगेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:18 AM2021-02-06T05:18:16+5:302021-02-06T05:18:16+5:30
सर्व प्रकारच्या शासकीय कामकाजात आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार अपडेट नसल्यास एस.टी. बस प्रवासात ज्येष्ठांना ५० टक्के सवलत मिळत ...
सर्व प्रकारच्या शासकीय कामकाजात आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार अपडेट नसल्यास एस.टी. बस प्रवासात ज्येष्ठांना ५० टक्के सवलत मिळत नाही. पूर्वी आधार कार्डवर जन्मतारखेऐवजी केवळ इ.स.चा उल्लेख होता; मात्र काही महिन्यांपासून दिनांक, महिना व वर्ष नमूद असलेलेच आधार कार्ड ग्राह्य धरण्यात येत आहे. त्यामुळे आधार नूतनीकरण करून घेणे गरजेचे ठरत आहे. त्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असताना त्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. बोगस वय नमूद करून एस.टी. प्रवासात सवलत मिळविणारे काही महाभाग आहेत. हा प्रकार बंद करण्यासाठी स्मार्ट कार्ड प्रणाली अमलात आणल्या गेली. त्यासाठीही आधार कार्ड अद्ययावत असणे आवश्यक आहे. दरम्यान, आधार अपडेट करण्याकरिता बायोमेट्रिक १०० आणि डेमो ग्राफिकसाठी ५० रुपये आकारण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र त्यापेक्षाही अधिक पैसे काही ठिकाणी आकारले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
................
कोणाचे किती केंद्र
जिल्हा प्रशासन - २
बँका - ७
पोस्ट ऑफिस - १
............................
का करावे लागते आधार नूतनीकरण
प्रशासकीय कामकाजासोबतच शाळा, महाविद्यालये, रेशन दुकान, बँकींग यांसह इतरही विविध ठिकाणी आधार कार्डची गरज भासत आहे. असे असताना जुन्या आधार कार्डमध्ये जन्म दिनांक, महिना, वर्ष नसण्यासह इतरही त्रुटी असून, त्या दूर करण्यासाठी आधार नूतनीकरण करणे आवश्यक ठरत आहे.
...............
कोट :
वाशिम शहरात प्रशासनाकडून तहसील कार्यालय आणि जुनी नगर परिषदेच्या इमारतीत अशा केवळ दोन ठिकाणी आधार अपडेट केंद्र कार्यान्वित आहे. त्याठिकाणी अधिक गर्दी राहत असल्याने नाइलाजास्तव बँकांमधील आधार अपडेट केंद्राकडे धाव घ्यावी लागते. तिथे मात्र नागरिकांची लूट होत आहे.
- बंटी मुंदडा, वाशिम.
..............
बायोमेट्रिक पद्धतीने आधार अपडेट करण्यासाठी नियमानुसार १०० रुपये आणि डेमो ग्राफिक पद्धतीने ५० रुपये आकारायला हवे; मात्र काही बँकांमध्ये यापेक्षाही अधिक रक्कम आकारण्यात येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.
- मनिष बत्तुलवार, वाशिम.