गांडूळ खत विक्रीतून युवा शेतकऱ्याने साधला स्वयंरोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:27 AM2021-06-10T04:27:38+5:302021-06-10T04:27:38+5:30
रासायनिक खतांचे दर वर्षागणिक वाढत चालले असून, या खताच्या अतिवापराने जमिनीची सुपीकताही नष्ट होत चालली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना नापिकीचा ...
रासायनिक खतांचे दर वर्षागणिक वाढत चालले असून, या खताच्या अतिवापराने जमिनीची सुपीकताही नष्ट होत चालली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागत आहे. या सर्व प्रतिकूल बाबींवर मात करण्यासाठी बहुतांश शेतकरी गांडूळखताच्या वापरास प्राधान्य देत आहेत.
दरम्यान, योगेश गारडे या युवा शेतकऱ्याने ही बाब हेरून शेतातील ६० बाय ६० जागेवर गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारला. त्यासाठी लागणारे गांडूळ त्याने कोल्हापूर येथून विकत आणले. या माध्यमातून फेब्रुवारी २०२१ पासून खत निर्मितीस प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. तीनच महिन्यांत दर्जेदार खत निर्मिती झाली असून ५०० रुपये प्रतिबॅगप्रमाणे ३०० बॅग खताची परिसरातील शेतकऱ्यांनाच विक्री करण्यात आली. यामाध्यमातून दीड लाखाची मिळकत झाल्याचे योगेशने सांगितले. दरम्यान, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्यासह परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी योगेशच्या गांडूळखत निर्मिती प्रकल्पास भेट देऊन त्याने अंगीकारलेल्या व्यवसायाचे काैतुक केले.
....................
बाॅक्स :
एक किलो बॅगची पॅकिंग; नागपूरला करणार विक्री
गांडूळखत हे शेतासोबतच घराच्या अंगणात, घराच्या छतावरील बगिचांमध्ये असणाऱ्या झाडांकरिताही उपयुक्त आहे. त्यामुळे प्रत्येकी एक किलो खताची बॅग तयार करून त्याची नागपूरच्या बाजारात विक्री करणार असल्याचे योगेश गारडे याने सांगितले. तशी मागणीदेखील असल्याचे तो म्हणाला.