बांबर्डाच्या युवा शेतकऱ्यांनी तयार केले हातपेरणी यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 03:56 PM2018-06-24T15:56:07+5:302018-06-24T15:58:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
बांबर्डा कानकिरड: कारंजा तालुक्यातील युवा शेतकऱ्यांच्या समुहाने शेतकऱ्यांना सोयीचे आणि कमी खर्चात, कमी वेळेत अधिक पेरणी करता येऊ शकणारे हात पेरणी यंत्र तयार केले आहे. या यंत्रामुळे ट्रॅक्टर, बैलजोडी, मजुर यांच्यासाठी लागणारा मोठा खर्च निम्म्याहूनही अधिक कमी झाला असून, हे यंत्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
बांबर्डा कानकिरड येथील युवा शेतकरी अरविंद कानकिरड आणि श्रीधर कानकिरड यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आणि मानवचलित असे यंत्र तयार करण्याचा त्यांचा पूर्वीपासूनच मानस होता. या संकल्पनेतून त्यांनी इतर युवा शेतकऱ्यांच्या सहकार्याने जेनेसिस इंजिनिअरिंग नावाचे वर्कशॉप सुरू केले आणि हात डवऱ्याच्या धर्तीवर हातपेरणी यंत्र विकसीत केले. हाताने ढकलता येणाऱ्या या पेरणी यंत्रावर त्यांनी पेरणीचे बियाणे टाकण्यासाठी एक पेटी तयार केली असून, हे यंत्र पुढे ढकलत असताना त्यामधून बीजे पडून आपोआप पेरणी पूर्ण होते. या यंत्राच्या आधारे कपाशी, सोयाबीन, तूर, मुग, उडिद, मका, ज्वारी, बाजरी, तीळ तसेच भाजीपाला बियाण्यांची अतिशय कमी वेळेत व कमी खर्चात पेरणी करता येते. अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांकडे बैलजोडीची व्यवस्था नसते, तसेच ट्रॅक्टरने पेरणी करण्याचा खर्चही त्यांना परवडणारा नसतो. सद्यस्थितीत दोन एकर कपाशीच्या पेरणीसाठी किमान सहाशे रुपये खर्च येतो; परंतु बांबर्डा येथील युवा शेतकºयांनी विकसीत केलेल्या हातपेरणी यंत्रामुळे दोन एकर क्षेत्रात अवघ्या दोनशे रुपयांत पेरणी पूर्ण होत. या यंत्राद्वारे एक फुटापासून दोन फुट किंवा पाहिजे तेवढे अंतर ठेवून सहज पेरणी करता येते. त्यामुळे अल्पभूधारक शेतकºयांसाठी हे पेरणी यंत्र अतिशय फायदेशीर ठरत आहे. हातपेरणी यंत्राबरोबरच या युवा शेतकºयांनी डवरणी, सरी पाडणे, हात फवारणी यंत्र शेत कूंपणाची चैन लिंक जाळी, अशी यंत्रेही तयार केली आहेत. अल्पभूधारक शेतकºयांसाठी सुक्ष्म तंत्रज्ञानाचा कसा फायदा होईल हा विचार करून हे शेतकरी वेगवेगळी यंत्रे तयार करण्यावर भर देत आहेत.