युवा शेतकरी स्वत:च उत्पादन घेऊन करताे विक्री!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 11:02 AM2020-12-22T11:02:16+5:302020-12-22T11:04:05+5:30
Enovative Farmer खचून न जाता देवा राऊत या युवा शेतकऱ्याने शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली.
- नंदकिशाेर नारे
वाशिम : शेती करणे दिवसेंदिवस कठिण हाेत आहे. अशा परिस्थितीत खचून न जाता देवा राऊत या युवा शेतकऱ्याने शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली. ‘सेंद्रिय भाजीपाला ’ व्हाॅट्स ॲप ग्रुप तयार करून पिकवलेल्या मालाची स्वत: विक्री सुरू केली. हर्रासीमध्ये भाजीपाल्याला मातीमाेल भाव मिळत असल्याने त्यांने ही शक्कल लढवून व्हाॅट्सॲप ग्रुपवर दरराेज उपलब्ध भाजीपाला पाेस्ट करणे व त्यावरच ऑर्डर घेऊन या युवा शेतकऱ्याने उन्नती साधली आहे.
सद्यस्थितीत पिकांचे विविध संकटांमुळे हाेणारे नुकसान पाहता शेती करणे कठिण झाले आहे. परंतु, राऊत या शेतकऱ्याने आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती करून भाजीपाला उत्पादन घेतले.
आधी भाजी बाजारात हर्रासीत माल नेला. परंतु, भाजीपाल्याला मिळत असलेला मातीमाेल भाव पाहता कृषी अधीक्षक शंकर ताेटावार व इतर कृषी विभागाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनात स्वत: भाजीपाला विक्रीचा निर्णय घेतला. त्यांनी व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करून त्यामध्ये दरराेज उपलब्ध भाजीपाल्याची लिस्ट टाकणे सुरू केले. याला लाभलेला प्रतिसाद पाहता एका ग्रुपची सदस्य मर्यादा संपुष्टात आल्याने आता दुसरा ग्रुप तयार केला जात आहे. या उपक्रमाचे सर्वत्र काैतुक केले जात असून, दरराेज या ग्रुपमध्ये सकाळपासून भाजीपाला घेणाऱ्यांची यादी पाेस्ट हाेताना दिसून येत आहे.
रानभाज्यांचेही उत्पादन घेणे सुरू केले!
गत एक वर्षापेक्षा जास्त दिवसापासून ग्रुपवर एकाच भाजीची यादी पाेस्ट करताना ग्राहकांनाही काही नवीन मिळत नसल्याने व्यवसायावर परिणाम हाेत असल्याचे दिसून आल्याबराेबर राऊत यांनी रानभाज्यांचे उत्पादन घेणे सुरू केले. आजच्या घडीला त्यांच्याकडे बाजारात उपलब्ध नसलेल्या रानभाज्यांसह इतर भाज्या माेठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे असलेला काही भाजीपाला जाे बाजारात सहसा मिळून येत नाही यामध्ये गुळवेल, लेटूस, मुळा शेंग, बीट, काळी मिरचीचा समावेश आहे.