युवकांना साहित्याची गोडी लागणे गरजेचे- प्रा.डॉ. योगिनी सातारकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 03:08 PM2020-02-01T15:08:11+5:302020-02-01T15:09:18+5:30
मी रामानंद तीर्थ विद्यापिठाच्या प्रा.डॉ. योगिनी सातारकर (पांडे) याच्याशी साधलेला हा संवाद...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : युवा साहित्यीकांच्या प्रतिभेला हक्काचे व्यासपिठ मिळवून देण्यासाठी तद्वतच विविध क्षेत्रातील युवा प्रतिभावंतांचा यथोचित सन्मान व्हावा, या उद्देशाने वाशिमच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाने २ फेब्रूवारीला चौथे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाचे अध्यक्षस्थान नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाच्या प्रा.डॉ. योगिनी सातारकर (पांडे) भुषविणार आहेत. त्यांची आजवरची कारकिर्द व युवकांचा कल साहित्य क्षेत्राकडे वाढविण्यासंबंधी काय करता येईल, यासंदर्भात त्यांच्याशी साधलेला हा संवाद...
आपला आतापर्यंतचा लेखन प्रवास कसा झाला?
साधारण नववीत असतानाच कविता लिहण्याचा छंद मला जडला. वडील नांदेड विद्यापीठात नोकरीला असल्याने मी बारावीनंतरच्या शिक्षणासाठी नांदेडला आले. शिक्षण सुरू असतानाच कविता लिहिणेही सुरूच होते. याशिवाय लेख, स्फुट लेखनही करता आले. २०१५ मध्ये माझा ‘जाणिवांचे हिरवे कोंभ’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्याला विशाखा पुरस्कारासह एकूण १४ साहित्य पुरस्कार मिळाले.
युवक-युवतींना साहित्याकडे कसे वळविता येईल?
वाचनाची गोडी जाणीवपूर्वक जोपासणे महत्वाचे आहे. सोशल मीडियासह विविध प्रसार माध्यमांनी व्यापलेल्या या काळात युवक-युवतींमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी सर्वंकष प्रयत्न होणे गरजेचे आहे. फिरती वाचनालये, विविध स्वरूपातील स्पर्धांमधून ते करता येणे शक्य आहे. नव्याने लिहू पाहणाºया युवकांना संधी व व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. सद्या फेसबुकसारख्या माध्यमामुळे ते मिळाले आहे; पण त्यासोबतच यामाध्यमातून रचलेले साहित्य किती गंभीरपणानी लिहिलेले आहे आणि त्यातून नवोदितांना किती प्रोत्साहन मिळते, यावरही विचार होणे आवश्यक आहे.
युवा साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटते?
वाशिममधील युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला मिळाले, याचा आनंद आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच एका महिलेला अध्यक्षपद मिळाले, याचेही समाधान आहे. माझ्या पिढीतील लिहित्या हातांची प्रतिनिधी म्हणून मी येथे आहे, याची आपणास जाणीव आहे. दरवर्षी विदर्भातील एका गावात संमेलन ठेवण्याची कल्पना स्तुत्य आहे. यामुळे वैचारिक परिवर्तन होणे शक्य आहे.