डेंग्युसदृश आजाराने युवतीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 05:52 PM2019-09-16T17:52:01+5:302019-09-16T17:52:13+5:30
१८ वर्षीय युवतीचा डेंग्युसदृश आजाराने अकोला येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कारंजा तालुक्यातील घटना: दुसºयावर अमरावती येथे आयसीयूत उपचार
लोकमत न्यूज नेटवर्क
कामरगाव (वाशिम) : कारंजा तालुक्यातील बेंबळा येथील छाया रामदास भोयर या १८ वर्षीय युवतीचा डेंग्युसदृश आजाराने अकोला येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर याच गावातील अतुल दिलीप जवंजाळ हा तीस वर्षीय युवक अमरावती येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे.
बेंबळा येथील छाया रामदास भोयर या युवतीस ८ दिवसांपूर्वी ताप आल्याने तिला कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी प्रकृतीत सुधारणा झाली नाही. तिला डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे दिसल्यानंतर डॉक्टरांनी अकोला येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्या ठिकाणी उपचार सुरू असतानाच रविवार १५ सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, याच गावातील अतुल दिलीप जवंजाळ या युवकालाही डेंग्यूसदृष आजाराची लागण झाली असून, त्याच्यावर ाअमरावती येथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात येत आहेत. गावात डेंग्युसदृश आजाराची साथ पसरल्याने ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोग्य विभागाने या ठिकाणी तातडीने आरोग्य शिबिर राबविण्याची मागणी होत आहे.
छाया भोयर या युवतीला तापाची लागण झाली होती. तिच्यावर कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात चार दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी तिला अकोला येथे हलविले. तेथे उपचारादरम्यान रविवारी तिचा मृत्यू झाला. तिला डेंग्युची लागण झाली होती काय, हे तपासणी अहवालावरूनच स्पष्ट होणार आहे. बेंबळा येथे आरोग्य पथक पाठवून तातडीने उपाय योजना करणार आहोत.
-डॉ. एस.आर. नांदे
तालुका आरोग्य अधिकारी, कारंजा