कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ‘युवा संसद’; व्यक्तिमत्व विकासावर भर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 03:52 PM2019-07-28T15:52:00+5:302019-07-28T15:52:04+5:30
युवामध्ये नेतृत्त्व गुणांचा विकास करणे, विकास प्रक्रियेत युवकांना सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून आता कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये युवा संसद हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सामाजिक प्रश्नांबाबत युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये नवसंकल्पना मांडण्यासाठी मुक्त व्यासपीठ, युवामध्ये नेतृत्त्व गुणांचा विकास करणे, विकास प्रक्रियेत युवकांना सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून आता कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये युवा संसद हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. वक्तृत्व यासह विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.
राष्ट्रीय व राज्य निर्माणामध्ये युवांचा सहभाग वाढविणे, युवांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास करणे, सामाजिक कार्यासाठी युवांना प्रोत्साहित करून संधी उपलब्ध करून देणे, युवांचे विचार व अपेक्षा जाणून घेणे, युवांच्या सुप्त गुणांना वाव देणे, नवीन तंत्रज्ञानाचा स्पर्धेच्या युगात वापर करणे या उद्देशाने कनिष्ठ महाविद्यालयातील १५ ते १९ वर्षे वयोगटातील युवकांसाठी ‘युवा संसद’ कार्यक्रमांची रेलचेल आॅगस्ट महिन्यात राहणार आहे. जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना या कार्यक्रमासाठी नोडल आॅफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्र संघटन यांचे तांत्रिक सहकार्यही घेतले जाणार आहे. राज्यात ९७०० कनिष्ठ महाविद्यालये असून, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रथम फेरी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. २० कनिष्ठ महाविद्यालयांचा एक गट याप्रमाणे ५०० गटामध्ये तालुकास्पर्धा घेतल्या जाणार आहेत. ज्या तालुक्यात २० पेक्षा कमी कनिष्ठ महाविद्यालये असतील तेथे दोन, तीन तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा गट करण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत. तालुका/गट स्तरावरील स्पर्धेतून प्रत्येक तालुका/गटातील सर्वोत्कृष्ट ३ युवा जिल्हास्तरावर छात्र युवा संसदेत सहभागी होणार आहेत. जिल्हास्तरावरून सर्वोत्कृष्ट तीन युवक हे राज्यस्तरावरील युवा संसदेत सहभागी होतील. तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांवर विचार मांडले जाणार आहेत. विषयाचे सखोल ज्ञान, मुद्देसुद मांडणी, वक्तृत्व कला, सादरीकरण व प्रभाव या पाच बाबींसाठी प्रत्येकी २० याप्रमाणे १०० गुणांचे मुल्यांकन केले जाणार आहे. १ ते ८ आॅगस्ट या दरम्यान कॉलेजस्तरावर वक्तृत्व स्पर्धा याप्रमाणे ९ ते १५ आॅगस्ट दरम्यान तालुकास्तर, १६ ते २५ आॅगस्ट दरम्यान जिल्हास्तर आणि २६ ते ३० आॅगस्ट दरम्यान राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत.