‘फ्रीडम रन’मध्ये मुक्तपणे धावली तरुणाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:42 AM2021-09-19T04:42:20+5:302021-09-19T04:42:20+5:30
वाशिम : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नेहरू युवा केंद्राच्यावतीने आज, १८ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय ‘फ्रीडम रन’चे आयोजन करण्यात आले ...
वाशिम : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नेहरू युवा केंद्राच्यावतीने आज, १८ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय ‘फ्रीडम रन’चे आयोजन करण्यात आले होते. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ऍड. किरणराव सरनाईक यांनी हिरवी झेंडी दाखविली. जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरू झालेल्या ‘फ्रीडम रन’मध्ये शहर परिसरातील तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नेहरू युवा केंद्रामार्फत १३ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान वाशिम जिल्ह्यातील ७५ गावांमध्ये ‘फ्रीडम रन’चे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून आरोग्य सदृढ ठेवण्याचा व स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून १८ सप्टेंबर रोजी वाशिम येथे झालेल्या जिल्हास्तरीय ‘फ्रीडम रन’चे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा क्रीडा संकुल येथून सिव्हील लाईन्स रोड, आयटीआय, नवीन नगर परिषद इमारत, अग्निशमन कार्यालय डॉ. देशमुख हॉस्पिटलमार्गे पुन्हा जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर ‘फ्रीडम रन’चा समारोप झाला. यामध्ये शेख जमीर, संजय चटे, राजेश चटे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. आमदार ॲड. सरनाईक यांच्याहस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, अनिल ढेंग, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखा अधिकारी युसुफ शेख, स्काउट्सचे जिल्हा संघटक राजेश गावंडे, एनसीसीचे अमोल काळे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या डॉ. भारती देशमुख, मनिषा कीर्तने, क्रीडा संघटनेचे धनंजय वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.