मन, बुद्धीला न पटणाऱ्या बाबींबद्दल युवकांनी ठोस भूमिका घ्यावी! - विठ्ठल वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 02:19 PM2020-02-03T14:19:33+5:302020-02-03T14:20:13+5:30
युवकांनी जे पटत नाही, त्याबद्दल ठोस भूमिका घ्यायला हवी आणि प्रतिक्रिया देखील नोंदवत राहावी, असे प्रतिपादन लोक कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: आपल्या सभोवताल जे घडते, ते मनाला व बुद्धीलाही पटत नाही. असे असताना आपण त्याच्याबद्दल कुठलीही ठोस भूमिका घेत नाही, प्रतिक्रिया नोंदवत नाही, अशी सद्याची परिस्थिती आहे; मात्र असे व्हायला नको. युवकांनी जे पटत नाही, त्याबद्दल ठोस भूमिका घ्यायला हवी आणि प्रतिक्रिया देखील नोंदवत राहावी, असे प्रतिपादन लोक कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी केले.
वाशिम येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय व सृष्टी बहुद्देशीय संस्था, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २ फेब्रूवारीला चौथे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन एसएमसी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणात पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. डॉ. योगीनी सातारकर-पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या युवा मराठी साहित्य संमेलनास प्रा. डॉ. संतोष हुशे, नाट्यकर्मी सुरेश नागले, ज्येष्ठ लेखक नामदेव कांबळे, तेजेंद्रसिंह चौहान, प्राचार्य संजय चौधरी, डॉ. विजय काळे, तरुणाई फाउंडेशनचे संस्थापक मनजितसिंह शिख, काव्याग्रहचे विष्णू जोशी, पूर्व संमेलनाध्यक्ष नवनाथ गोरे, नाशिकचे किरण सोनार, सामाजिक कार्यकर्ते अॅड. पप्पू मोरवाल, वºहाडी साहित्यिक अरविंद शिंगाडे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
लोक कवी विठ्ठल वाघ म्हणाले, गरिबी आहे, दारिद्रय आहे, मी खेड्यातून आलो आहे, असे वारंवार म्हणून रडत बसायचे नाही. कितीही मोठा पहाड चढणे कठीण असते म्हणून हार मानू नका; तर सतत जिंकण्यासाठी संघर्ष करा, असा सल्ला यावेळी विठ्ठल वाघ यांनी उपस्थित युवा साहित्यीकांना दिला. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘सृष्टी’चे अध्यक्ष संतोष इंगळे यांनी केले. विशालराजे बोरे, प्रा. गजानन वाघ यांनी सूत्रसंचालन केले.
दुसºया सत्रात ‘कायद्याची सक्ती महिलांवरील अत्याचार थांबवू शकते का?’ या विषयावर परिसंवाद झाला. तिसºया सत्रात नितीन वरणकार यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. गोपाल खाडे, वैभव भिवरकर, अॅड. विशाखा बोरकर, अनिकेत देशमुख, ग. ना. कांबळे, गजानन फुसे, प्रा. सुनिता अवचार, स्वप्नील कोकाटे, गणेश बोंडे, रामदास देशमुख आदिंनी रंगारंग कविता सादर करून संमेलनात रंगत आणली. सूत्रसंचालन चाफेश्वर गांगवे, डॉ. विजय काळे यांनी केले. त्यानंतर संमेलनाध्यक्ष डॉ. योगिनी पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय कार्यक्रम पार पडला. प्रसिद्ध लेखक बाबाराव मुसळे, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, कथाकार सुरेश पाचकवडे, अॅड. अनंत खेळकर, नरेंद्र लांजेवार, किशोर बळी, प्रा. डॉ. मोहन खडसे, माणिक शेळके, डॉ. नितेश खोंडे, डॉ. हरीश बाहेती, आदिंची प्रमुख उपस्थिती होती. शब्दसृष्टी साहित्य रत्न पुरस्कार, युथ आयकॉन पुरस्कारांचे वितरणही संमेलनात करण्यात आले.