ईदनिमित्त मित्रमंडळींसोबत फिरायला गेलेल्या युवकाचा धरणात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:27 PM2018-06-16T18:27:35+5:302018-06-16T18:27:35+5:30
कारंजा लाड (वाशिम) : येथील गवळीपुरा भागात वास्तव्यास असलेल्या २५ वर्षीय युवकाचा तालुक्यातील अडाण धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना १६ जून रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.
कारंजा लाड (वाशिम) : येथील गवळीपुरा भागात वास्तव्यास असलेल्या २५ वर्षीय युवकाचा तालुक्यातील अडाण धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना १६ जून रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, ईदनिमित्त गवळीपुरा येथील रशिद मन्नान गारवे व त्याचे पाच ते सहा मित्र कारंजा येथून १५ किलोमिटर अंतरावर असलेल्या अडाण धरण परिसरात फिरायला गेले होते. यादरम्यान रशिद गारवे याला धरणात पोहण्याची इच्छा झाली. त्यामुळे तो धरणात उतरला असता, त्याचा तोल खोल पाण्यात गेला व काही वेळातच तो धरणात बुडाला. याबाबतची माहिती मित्रांनी रशिदच्या कुटुंबासह मित्रमंडळींना देताच संपूर्ण गवळीपुरा परिसरातील ४०० ते ५०० नागरिकांनी अडाण धरण गाठले. यातील काही जलपटू युवकांनी शर्थीचे प्रयत्न करून रशिदचा पाण्यात शोध घेतला. अथक प्रयत्नानंतर धरणात बुडालेल्या रशिद गारवेला पाण्याबाहेर काढण्यात आले. त्याला कारंजा येथील डॉ. अजय कांत यांच्या दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत रशिदची प्राणज्योत मावळली होती.
रशिद हा मनमिळावू स्वभावाचा होता. तसेच पदवीपर्यंतचे शिक्षणही त्याने पुर्ण केले होते. ईदनिमित्त मित्रमंडळींसोबत फिरायला गेलेला रशिद पुन्हा परतणार नाही, अशी आशाही कुणाला नसताना पवित्र सणाच्या दिवशी काळाने गारवे कुटुंबावर घाला घातला. या घटनेप्रती येथे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.