युवा माहिती दूत’ करणार शासकीय योजनांचा जागर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 03:06 PM2018-08-19T15:06:27+5:302018-08-19T15:08:08+5:30
वाशिम : युनिसेफच्या सहयोगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली असून, शासनाच्या कल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे काम केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

‘युवा माहिती दूत’ या उपक्रमामुळे महाविद्यालयीन युवकांना समाजातील गरजू, वंचित लोकांपर्यंत जावून त्यांच्यापर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहचविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या उपक्रमामुळे गरजू व पात्र लाभार्थ्यांला शासनच्या कल्याणकारी योजनांची अचूक माहिती तसेच त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे, लागेल याविषयी मार्गदर्शन मिळणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी या उपक्रमामुळे मोठी मदत होणार आहे.
या अभियानाच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवक-युवतींना ‘युवा माहिती दूत’ म्हणून संधी उपबल्ध झाली आहे. या युवक-युवतींसाठी एक अॅप तयार करण्यात आले असून त्यात शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती आहे. या अॅपचा वापर करुन हे युवा माहिती दूत गावागावात नागरिकांपर्यंत पोहचणार आहे. नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देणे तसेच त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यासोबतच अर्ज कुठे व कसा करायचा याविषयी मदत करुन युवा माहिती दूत प्रत्येकी ५० कुटुंबापर्यंत शासकीय योजनांची माहिती व लाभ देतील. त्यानंतर युवा माहिती दूतांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.