गावातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी  हिवरा येथील युवकांचा पुढाकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 02:28 PM2018-01-29T14:28:52+5:302018-01-29T14:31:18+5:30

वाशिम -  शिक्षणाचा दर्जा उंचावून गाव उच्चशिक्षित करण्यासाठी मानोरा तालुक्यातील हिवरा येथील उच्च शिक्षित युवकांनी सर्वांसाठी आदर्श ठरावा असा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

Youth's initiative to raise the quality of education in the village! | गावातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी  हिवरा येथील युवकांचा पुढाकार !

गावातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी  हिवरा येथील युवकांचा पुढाकार !

Next
ठळक मुद्देविविध स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी त्यांनी दर्जेदार पुस्तकांचा संग्रह करून एक अभ्यासिका गावात सुरू केली आहे.या ठिकाणी मोफत शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून सदर युवक स्पर्धा परीक्षेसंदर्भात इतरांना मार्गदर्शन करीत आहेत.सरपंच अनिल चव्हाण यांनी २६ जानेवारी रोजी या अभ्यासिकेचे रितसर उद्घाटन केले.

वाशिम -  शिक्षणाचा दर्जा उंचावून गाव उच्चशिक्षित करण्यासाठी मानोरा तालुक्यातील हिवरा येथील उच्च शिक्षित युवकांनी सर्वांसाठी आदर्श ठरावा असा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये, यासाठी हे युवक गावातील मुलांना मार्गदर्शन करीत असून, विविध स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी त्यांनी दर्जेदार पुस्तकांचा संग्रह करून एक अभ्यासिका गावात सुरू केली आहे. या ठिकाणी मोफत शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून सदर युवक स्पर्धा परीक्षेसंदर्भात इतरांना मार्गदर्शन करीत आहेत.

मानोरा तालुक्यातील हिवरा खुर्द येथील ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असला तरी, मागील काही वर्षांपासून या गावात उच्चशिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. येथील बरेच युवक उच्चशिक्षण घेऊन शासकीय सेवेत उच्च पदे भुषवित आहेत. असे असले तरी, गुणवत्ता असतानाही गावांतील गोरगरीबांची अनेक मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर पडून मोलमजुरी करीत आहेत.  गरीबीतूनच उच्च शिक्षण घेऊन  आपले जीवनमान उंचावणारे युवक आणि गावातील प्रतिष्ठितांना ही गंभीर बाब सतत बोचत होती. त्यामुळे या सर्वानी एकत्र येऊन गावातील शिक्षणाची गंगा सतत वाहत ठेवण्याचा निर्धार केला. यासाठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकवृंद, गावचे तलाठी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि इतर मंडळीचे सहकार्य घेऊन या युवकांनी लोकवर्गणी केली आणि वर्ग पहिली ते उच्च पदवीपर्यंतच्या पुस्तकांसह स्पर्धा परिक्षेची महागडी पुस्तके विकत घेऊन गावात एक खोपडी अभ्यासिका सुरू केली. दर महिन्याला लोकवर्गणी करून पुस्तकांचा संचय वाढविण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. केवळ पुस्तके उपलब्ध करूनच चालणार नसल्याचे गावातील उच्चशिक्षितांना माहिती असल्याने ते स्वत: या ठिकाणी वर्ग घेऊन गावातील होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करण्यात येत आहे. त्यामध्ये स्पर्धा परिक्षेची तयारी कशी करायची, अर्ज भरताना कोणती काळजी घ्यायची स्वत:ला परिक्षेसाठी मानसिकदृष्ट्या तयार कसे करायचे, ही सर्व माहिती देऊन विद्यार्थ्यांचे सर्वकश ज्ञान अद्ययावत करण्यासाठी चाचण्याही घेण्यात येणार आहेत. गावचे युवा सरपंच अनिल चव्हाण यांनी २६ जानेवारी रोजी या अभ्यासिकेचे रितसर उद्घाटन केले. यासाठी गावचे तलाठी धोत्रे यांच्यासह जि.प. शिक्षकांचे महत्त्वाचे सहकार्य लाभत आहे. 

Web Title: Youth's initiative to raise the quality of education in the village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम