बहुपयोगी वृक्षांच्या बिया संकलित करण्यासाठी वृक्षप्रेमी युवकांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:19 PM2019-06-09T12:19:32+5:302019-06-09T12:19:52+5:30
सावली प्रतिष्ठानच्या २६ युवकांनी बहुपयोगी वृक्षांच्या बिया गोळा करण्याची धडपड चालविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून झाडे जगविण्याशिवाय आता इतर कुठला पर्याय शिल्लक राहिलेला नाही. ही बाब लक्षात घेवून सावली प्रतिष्ठानच्या २६ युवकांनी बहुपयोगी वृक्षांच्या बिया गोळा करण्याची धडपड चालविली आहे. यामाध्यमातून आतापर्यंत २ हजार बियांचे संकलन देखील झाल्याची माहिती प्रतिष्ठानचे राम धनगर यांनी दिली.
सावली प्रतिष्ठानच्या युवकांनी रानावनात भटकंती करून विविध प्रजातीच्या आंब्याच्या कोयी जमा केल्या असून त्यापासून नैसर्गिक रोपे तयार केली जात आहेत. यासह डोंगरची मैना म्हणून प्रसिद्ध असलेल्या करवंदाच्याही बिया संकलित करण्यात आल्या आहेत. गतवर्षी लागवड केलेली करवंदाची झाडे माळरानावर आकार घेत आहेत, हे विशेष. इतरही बहुपयोगी वृक्षांच्या बिया संकलित करण्यात आल्या.
सीडबॉल तयार करून ओसाड रानात होणार बियांचे रोपन!
सावली प्रतिष्ठानने बहुपयोगी वृक्षांच्या २ हजार बियांचे संकलन केले असून आंजन, बेल, टेंभूर्णी, चारोळी, गोधन, धामण, आंबा, करवंद आदींचा त्यात समावेश आहे. या बियांना माती आणि शेण लावून तयार झालेले सीडबॉल पहिल्या मोठ्या पावसानंतर जिल्ह्यातील ओसाड रानात लागवड केली जाणार आहे. या उपक्रमात सावली प्रतिष्ठानशी जुळलेले २६ सदस्य पूर्ण दिमतीने कार्यरत असल्याची माहिती राम धनगर यांनी दिली.