जिल्हा परिषद निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 03:41 PM2019-11-20T15:41:37+5:302019-11-20T15:41:56+5:30
निवडणूकांची आचारसंहिता जिल्ह्यात १९ नोव्हेंबरपासूनच लागू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील ५२ जिल्हा परिषद गट व १०४ पंचायत समिती गणांसाठी जानेवारी २०२० या महिन्यात होऊ घातलेल्या निवडणूकीसाठी प्रशासन संपूर्ण तयारीनिशी सज्ज असून निवडणूकीच्या आचारसंहितेचे नागरिकांनी काटेकोरपे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले.
राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार वाशिम जिल्हा परिषद व त्यांतर्गत येणाºया वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा लाड आणि मानोरा या सहा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी मतदान; तर ८ जानेवारी २०२० रोजी मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निवडणूकांची आचारसंहिता जिल्ह्यात १९ नोव्हेंबरपासूनच लागू झाली आहे. १८ डिसेंबर २०१९ पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होईल. मतदान ७ जानेवारी २०२० रोजी घेण्यात येईल; तर ८ जानेवारी २०२० रोजी मतमोजणी होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता आचारसंहितेमधील तरतुदींचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मोडक यांनी केले.