जिल्हा परिषद निवडणूक : जागा टिकविण्याचे काँग्रेससमोर आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:41 PM2019-12-28T12:41:44+5:302019-12-28T12:41:50+5:30

महाविकास आघाडीचे भवितव्य अधांतरी असल्याने काँग्रेस, राकाँ व शिवसेनेच्या इच्छूक उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे.

Zilla Parishad Election: Challenge of Congress to retain seats! | जिल्हा परिषद निवडणूक : जागा टिकविण्याचे काँग्रेससमोर आव्हान!

जिल्हा परिषद निवडणूक : जागा टिकविण्याचे काँग्रेससमोर आव्हान!

Next

- संतोष वानखडे  
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, गतवेळच्या १७ जागा टिकवून ठेवण्याचे आव्हान काँग्रेससमोर उभे ठाकले आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील अस्तित्वासाठी अधिकाधिक जागा निवडून आणण्याची कसरत भाजपाला करावी लागणार आहे.
येत्या ७ जानेवारी रोजी जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येत असलेल्या सहा पंचायत समित्यांची निवडणूक होत आहे. ५२ जिल्हा परिषद गटासाठी ५३२ तर १०४ पंचायत समिती गणासाठी ८०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर खऱ्या अर्थाने लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत अजूनही महाविकास आघाडीचे भवितव्य अधांतरी असल्याने काँग्रेस, राकाँ व शिवसेनेच्या इच्छूक उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. गतवेळी माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविलेल्या काँग्रेसने सर्वाधिक १७ जागा जिंकल्या होत्या. वाशिम जिल्हा स्थापनेपासून ते २०१९ पर्यंत काँग्रेस पक्ष हा जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या केंद्रस्थानी राहिला आहे. विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या अनंतराव देशमुख यांना पक्षाने निष्काषित केल्यानंतर, रिसोड व मालेगाव तालुक्यात देशमुख समर्थकांनीदेखील काँग्रेसशी फारकत घेतल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत माजी खासदार देशमुख यांनी वाशिम जिल्हा जनविकास आघाडीच्या नावाखाली रिसोड, मालेगाव व मानोरा तालुक्यात स्वतंत्र उमेदवार उभे करून प्रमुख राजकीय पक्षांपुढे आव्हान निर्माण केले. याचा फटका काँग्रेसच्या काही उमेदवारांना बसण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे. गतवेळच्या जागा टिकवून ठेवण्याबरोबरच अजून काही जागा निवडून आणता येतील का या दृष्टिकोनातूनही काँग्रेसतर्फे चाचपणी केली जात आहे. गतवेळच्या जागा टिकवून ठेवण्याचे आव्हान काँग्रेसच्यावतीने कसे पेलते जाते? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. कारंजा व मानोरा तालुक्यात शिवसेना, राकाँ एकत्र येत असल्याने येथे काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. भारिप-बमसंचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी हे काँग्रेसवासी झाल्याने या दोन तालुक्यात ते काँग्रेसला कसे तारणार, यावर त्यांचे संभाव्य राजकीय वजन अवलंबून राहणार असल्याचेही बोलले जात आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणुक ही भारतीय जनता पार्टीच्यादृष्टीने महत्वपूर्ण मानली जात आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात भाजपाची मजबूत पकड नसते, असे एकंदरीत बोलले जाते. हा समज चुकीचा ठरविण्याची संधी भाजपाला जिल्हा परिषद निवडणुकीमुळे चालून आली आहे. गतवेळी भाजपाला केवळ सहा जागेवर विजय मिळविता आला होता. १९९८ पासून ते आतापर्यंत एकदाही भाजपाला सत्तेला गवसणी घालता आली नाही. जिल्ह्यात तीन पैकी दोन आमदार हे भाजपाचे असल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत सदस्य संख्या वाढविण्याची कसरत भाजपाला करावी लागणार आहे.
ग्रामीण भागातील अस्तित्वासाठी भारतीय जनता पार्टीची धडपड सुरू असल्याचे दिसून येते. राजूरा जि.प. गटात दोन माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या एबी फॉर्मवरून अंतर्गत धुसफूसही चव्हाट्यावर आल्याने जिल्हा परिषदेची निवडणुक भाजपासाठी अवघड मानली जात आहे.

राकाँ जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाची कसोटी
जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रतिष्ठेची ठरत आहे. साधारणत: दोन वर्षांपूर्वी जिल्हाध्यक्ष पद आल्यानंतर चंद्रकांत ठाकरे हे पहिल्यांदा जिल्हाध्यक्ष म्हणून जि.प. निवडणुकीला सामोेरे जात आहेत. तत्कालिन जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांनी राकाँला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीची वाट धरली आहे. जाधव यांचे मालेगाव तालुक्यात राजकीय प्रस्थ असल्याने ती उणीव भरून काढण्याचे आव्हान राकाँसमोर उभे ठाकले आहे. जिल्हा परिषद निवडणुक ही चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वाची कसोटी लावणारी ठरणार असल्याचे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे. गतवेळी राकाँच्या आठ जागा होत्या. यावेळी जागा वाढविण्याचे आव्हानही राकाँला पेलावे लागत आहे.

शिवसेनेच्या राजकीय डावपेचाकडे लक्ष

नेहमी धक्कातंत्राचा वापर करणाºया शिवसेनेचे राजकीय डावपेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत नेमके काय राहतील, याकडेही राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. गतवेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून डॉ. सुधीर कव्हर होते. यावेळी जिल्हा प्रमुखाची धुरा सुरेश मापारी यांच्याकडे आली आहे. गतवेळी शिवसेनेचे आठ जिल्हा परिषद सदस्य होते. यावेळी अधिकाधिक सदस्य निवडून आणण्याची कसरत शिवसेनेला करावी लागणार आहे. गतवेळी भाजपा व शिवसेनेची युती होती. यावेळी भाजपा सोबत नसल्याने ही उणीव भरून काढण्यासाठी शिवसेनेला नव्याने मांडणी करावी लागणार आहे. यामध्ये जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.


वंचित बहुजन आघाडीच्या धक्कातंत्राकडे लक्ष
वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत रिसोड व वाशिम विधानसभा मतदारसंघात बºयापैकी मते घेतली होती. गतवेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीत तीन सदस्य निवडून आले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली जिल्हा परिषद निवडणूक लढविली जात असून, अन्य पक्षातील माजी पदाधिकाऱ्यांना निवडणूक रिंगणात उतरवून निवडणुकीत रंगत आणण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. या प्रयत्नाला मतदारांकडून कसा प्रतिसाद मिळतो यावर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे.

 

Web Title: Zilla Parishad Election: Challenge of Congress to retain seats!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.