जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा : जुन्या याद्या रद्द; नवीन लाभार्थी निवडीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 02:50 PM2020-02-05T14:50:31+5:302020-02-05T14:50:53+5:30

सर्वसाधारण सभेत शिक्षण, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, बांधकाम, पंचायत विभागाशी संबंधित विविध मुद्यांवर वादळी चर्चा झाली.

 Zilla Parishad General Assembly: Old lists canceled; Decision on selection of new beneficiary | जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा : जुन्या याद्या रद्द; नवीन लाभार्थी निवडीचा निर्णय

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा : जुन्या याद्या रद्द; नवीन लाभार्थी निवडीचा निर्णय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महिला व बालकल्याण विभागाने यापूर्वी विविध लाभांसाठी लाभार्थींकडून मागविण्यात आलेले प्रस्ताव रद्द करून नव्याने लाभार्थींकडून अर्ज मागविण्याची मागणी सदस्यांनी लावून धरताच, जिल्हा परिषदेच्या सभागृहाने नवीन लाभार्थी निवडीला मंजुरात दिली. ४ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या या पहिल्याच सर्वसाधारण सभेत शिक्षण, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, बांधकाम, पंचायत विभागाशी संबंधित विविध मुद्यांवर वादळी चर्चा झाली.
सर्वसाधारण सभेचे पिठासीन अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, सभापती चक्रधर गोटे, विजय खानझोडे, वनिता देवरे, शोभा गावंड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांची उपस्थिती होती. सभेच्या सुरूवातीला मागील सर्वसाधारण सभेतील इतिवृत्त वाचन व चर्चा कायम करण्यावर एकमत झाले. जिल्हा पशुसंवर्धन विभागांतर्गत येणाऱ्या पशुचिकित्सा केंद्रात जंतनाशक औषध खरेदीच्या प्रस्तावाला सभागृहाने एकमुखी मंजूरी दिली. समाजकल्याण विभागाच्या डिझेल इंजिन या योजनेचा लाभ कमी करून त्याऐवजी पीव्हीसी पाईप, तुषार संच, इलेक्ट्रिक मोटारपंपाचा लाभ द्यावा अशी मागणी सदस्यांनी करताच, या नवीन सूचनेनुसार उपरोक्त साहित्याचा लाभ देण्यात यावा आणि १५ दिवसात अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश पिठासीन अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी समाजकल्याण विभागाला दिले. महिला व बालकल्याण विभागाने यापूर्वी काही योजनांसाठी लाभार्थींकडून अर्ज मागविण्यात आले होते. या लाभार्थींच्या यादीला मंजुरात देण्याचा प्रस्ताव येताच, काही सदस्यांनी याला आक्षेप नोंदविला. चरण गोटे, सुनील चंदनशील, सुनीता कोठाळे, मीना भोने, अरविंद पाटील इंगोले यांच्यासह अन्य सदस्यांनी या चर्चेत सहभाग नोंदविला. शेवटी जूनी लाभार्थी यादी रद्द करून नव्याने लाभार्थींकडून अर्ज मागविणे आणि ३१ मार्चपूर्वी लाभार्थींना साहित्याचा लाभ देण्याला सभागृहाने मंजूरी दिली. बांधकाम विभागाने सन २०१९-२० या वर्षातील काही रस्त्यांच्या बांधकामांना प्रशासकीय मान्यता देण्याचा ठराव सभागृहासमोर मांडला. यावेळी चक्रधर गोटे, श्याम बढे, चरण गोटे, सुनील चंदनशीव यांनी काही प्रस्तावांत दुरूस्ती करून नव्याने मंजूरी द्यावी, अशी मागणी लावून धरली. योग्य ती चौकशी करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश चंद्रकांत ठाकरे यांनी दिले. डोंगरकिन्ही जिल्हा परिषद गटात यापूर्वी करण्यात आलेल्या रस्ता कामांची पडताळणी करावी, अशी मागणीही चंदनशिव यांनी लावून धरली. याप्रकरणी चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश जि.प. अध्यक्ष ठाकरे यांनी दिले. अनु. जातीची लोकसंख्या अधिक असूनही उकळीपेन येथे रस्ता बांधकामासाठी कमी निधी आणि लोकसंख्या कमी असलेल्या गावांत जास्त निधी ही तफावत सभागृहाच्या निदर्शनात आणून दिली. उकळीपेन येथील रस्ता कामासाठी अधिक निधी द्यावा तसेच सुकळी येथील पात्र घरकुल लाभार्थींचा जागेच्या आठ अ चा मुद्दा निकाली काढण्याची मागणी चरण गोटे यांनी केली. यावर उकळीपेन येथील कामाची फेरचौकशी करण्याचे तसेच सुकळी येथील जागेच्या नमुना आठ अ चा मुद्दा निकाली काढण्याचे निर्देश पिठासीन अध्यक्षांनी दिले. जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करावा तसेच नव्यानेच आयएएस कॅडर मिळालेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांना वाशिम येथेच कायम ठेवण्यासाठी शासनाकडे विनंती करावी, असा ठराव जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे यांनी मांडला. हा ठराव एकमुखी मंजूर झाला. डोंगरकिन्ही येथील प्रभावित झालेली पाणीपुरवठा योजना, महिलांसाठी विशेष शिबिर, २२४ जिल्हा परिषद शाळेच्या ४०९ वर्गखोल्या निर्लेखित करणे व वर्गखोल्या दुरूस्ती, जिल्हा परिषदेच्या कोणत्याही सभा सकाळी ११ वाजता सुरू करणे, सभेपूर्वी सर्व सदस्यांना प्रत्येक विभागाचे बुकलेट देणे आदी विषयांवर चर्चा झाली. त्यात सभापती चक्रधर गोटे, विजय खानझोडे, जि.प. सदस्य पांडुरंग ठाकरे, अरविंद पाटील इंगोले, दिलीप देशमुख, डॉ. सुधीर कव्हर, श्याम बढे, चरण गोटे, सुनिल चंदनशीव, सुनिता कोठाळे, मीना भोने, उमेश ठाकरे आदींनी सहभाग घेतला.

Web Title:  Zilla Parishad General Assembly: Old lists canceled; Decision on selection of new beneficiary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.