जिल्हा परिषदेला मिळाले तीन अधिकारी; अजून सात विभागाला नाही कारभारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:49 AM2021-09-17T04:49:27+5:302021-09-17T04:49:27+5:30
वाशिम : जिल्हा परिषदेला गत चार दिवसांत चार अधिकारी मिळाले असून, अजून सात विभाग प्रभारींवरच सुरूच आहेत. गत एका ...
वाशिम : जिल्हा परिषदेला गत चार दिवसांत चार अधिकारी मिळाले असून, अजून सात विभाग प्रभारींवरच सुरूच आहेत. गत एका महिन्यापासून समाजकल्याण विभागाला जबाबदार अधिकारीच नसल्याने प्रशासकीय कामकाजाचा पुरता गोंधळ उडत आहे.
ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत एकूण १६ विभाग आहेत. दिमतीला सहा पंचायत समित्या आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत व स्वच्छता मिशन), बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशी १० पदे रिक्त होती. गत चार दिवसांत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुनील निकम, प्रकल्प संचालक म्हणून शेखर रौंदळ, जिल्हा स्वच्छता व पाणी विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गजानन वेले असे तीन अधिकारी रुजू झाले आहेत. अजूनही तीन कार्यकारी अभियंता, प्राथमिक शिक्षणाधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी आणि पंचायत विभागाला उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे. चारपैकी मालेगाव पंचायत समितीला गटविकास अधिकारी म्हणून विलास खिल्लारे रुजू झाले आहेत. उर्वरित रिसोड, मंगरूळपीर व वाशिम पंचायत समितीला कायमस्वरूपी गटविकास अधिकाऱ्यांची प्रतीक्षा आहे. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रभार सोपविण्यात आल्याने ‘ज्येष्ठ-कनिष्ठ’ वाद कायम असल्याची चर्चा रंगत आहे.
००००००००००
‘समाजकल्याण’चा प्रभार कुणी घेईना!
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला गत २५ दिवसांपासून कुणीही कारभारी मिळत नसल्याचे दिसून येते. या विभागाचा प्रभार यापूर्वी समाजकल्याणच्या सहायक आयुक्त माया केदार यांच्याकडे होता. केदार यांची बदली झाल्यानंतर सहायक आयुक्त म्हणून एम.जी. वाठ यांच्याकडे सूत्रे आली. वाठ यांच्याकडे अन्य तीन ठिकाणचा अतिरिक्त प्रभार असल्याने जि.प. समाजकल्याण अधिकारी म्हणून प्रभार घेण्यास त्यांनी असमर्थता दर्शविल्याची माहिती आहे. तेव्हापासून या विभागाला कुणी वालीच नाही. प्रशासकीय कारभार पूर्णत: ठप्प पडल्याने समाजाचे कल्याण होईल कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
...............
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा प्रभार निकम यांच्याकडे
१४ सप्टेंबर रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालेल्या सुनील निकम यांच्याकडे १६ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार सोपविला आहे.
...............
कोट
रिक्त पदांसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. सध्या तीन अधिकारी मिळाले आहेत. उर्वरित रिक्त पदांवर टप्प्याटप्प्याने अधिकारी मिळतील, अशी अपेक्षा आहे. समाजकल्याण विभागाचा प्रभार जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सोपविण्याबाबत संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला जाईल.
- डॉ. शाम गाभणे,
अध्यक्ष, जिल्हा परिषद, वाशिम