कोविड सेंटर उभारण्याच्या जिल्हा परिषदेच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:39 IST2021-04-25T04:39:44+5:302021-04-25T04:39:44+5:30
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, अकोला जिल्हा परिषदेप्रमाणेच वाशिम जिल्ह्यातही कोविड सेंटर उभारण्याच्या हालचाली सुरू ...

कोविड सेंटर उभारण्याच्या जिल्हा परिषदेच्या हालचाली
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, अकोला जिल्हा परिषदेप्रमाणेच वाशिम जिल्ह्यातही कोविड सेंटर उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षांनी सोमवार, दि.२६ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागातही कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत. त्या तुलनेत आरोग्यविषयक सुविधा अपुऱ्या पडत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना तालुकास्तरीय कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाते. जिल्हा कोविड हॉस्पिटल व कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचा अपवाद वगळता एकाही सरकारी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार किंवा ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध नाही. यामुळे गोरगरीब व ग्रामीण भागातील रुग्णांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’नेदेखील वृत्त प्रकाशित करून संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हास्तरावर कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी एका गोडावूनची पाहणी करण्यात आली असून, त्याअनुषंगाने हालचाली सुरू झाल्या. कोविड हॉस्पिटल उभारणीसाठी वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी अर्थात एम. डी. डॉक्टर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध नसल्याने ती प्रमुख अडचण येत असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, एम. डी. डॉक्टर व ऑक्सिजनची यंत्रणा उभी कशी करता येईल, या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी, विभागीय आयु्क्तांशी चर्चा सुरू असल्याचेही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कोविड केअर सेंटर उभारण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेकडे जागा व कर्मचारी उपलब्ध असल्याने याअनुषंगानेदेखील पडताळणी केली जाणार आहे. कोविड हॉस्पिटल उभारण्यासंदर्भात प्राथमिक टप्प्यातील चर्चा म्हणून सोमवार, दि. २६ एप्रिल रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. शाम गाभणे यांनी बैठक बोलाविली आहे. या बैठकीत नेमकी कशावर चर्चा होणार, कोविड हॉस्पिटल उभारण्याबाबत सकारात्मक तोडगा निघेल का? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.
००००००
कोट
कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर उभारण्याबाबत प्राथमिक टप्प्यात चर्चा सुरू आहे. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशीदेखील चर्चा झाली आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी २६ एप्रिल रोजी बैठक बोलाविण्यात आली आहे. शिक्षण सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.
- डॉ. शाम गाभणे,
अध्यक्ष, जिल्हा परिषद, वाशिम
००००
कोट
ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. कोविड हॉस्पिटलसंदर्भात एका गोडावूनची पाहणी करण्यात आली. कोविड केअर सेंटर उभारण्यासंदर्भातही नियोजन असून, आरोग्य अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे. याच मुद्द्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांशीदेखील चर्चा करण्यात आली आहे. सकारात्मक नियोजन सुरू आहे.
- चक्रधर गोटे,
सभापती, शिक्षण व आरोग्य,
जिल्हा परिषद, वाशिम
००००००
बॉक्स
मालेगाव येथील कोविड सेंटरबाबत नियोजन
तालुक्याचे ठिकाण असूनही मालेगाव येथे कोविड केअर सेंटर नाही. त्यामुळे मालेगाव तालुक्यातील कोरोनाबाधितांना ४० ते ५० किमी अंतरावरील वाशिम येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे लागत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी मालेगाव येथे कोविड केअर सेंटर उभारण्याबाबत जिल्हा परिषदेतर्फे नियोजन सुरू असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. गाभणे यांनी सांगितले.