जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचनेवर ३० हरकती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 03:20 PM2019-05-07T15:20:41+5:302019-05-07T15:20:49+5:30
अंतीम मुदतीपर्यंत जवळपास ३० जणांनी प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती नोंदविल्या असून त्यावर ९ मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येत असलेल्या एकूण ६ पंचायत समितीच्या निवडणुकांकरिता प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ३० मार्च २०१९ रोजी प्रसिद्ध केला. त्यानुसार, ३० एप्रिल रोजी जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नामाप्र व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षणासाठीची सोडत काढण्यात येवून ३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर अधिसूचना जाहीर करण्यात आली. त्यावर ६ मे पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. अंतीम मुदतीपर्यंत जवळपास ३० जणांनी प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती नोंदविल्या असून त्यावर ९ मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली आहे.
पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी २७ आॅगस्ट २०१८ रोजी काढण्यात आलेली आरक्षण सोडत व ३० एप्रिल २०१९ रोजी काढण्यात आलेली जिल्हा परिषदेच्या निर्वाचक विभागाकरिता आरक्षण सोडतीबाबतची प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना ३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, संबंधित तहसील कार्यालय, संबंधित पंचायत समिती कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर ६ मेपर्यंत हरकती व सूचना सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तुयानुसार, ३० जणांनी हरकती दाखल केल्या असून त्यावर ९ मे रोजी अमरावती विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.