जिल्हा परिषद,पंचायत समिती पोटनिवडणूक: ३१ जागांसाठी दाखल झाले केवळ ३८ उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 12:25 PM2021-07-04T12:25:09+5:302021-07-04T12:25:20+5:30
Zilla Parishad, Panchayat Samiti by-election : ५ जुलै ही उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत असून यादिवशी सर्वाधिक अर्ज दाखल होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २७ गणांसाठी पोटनिवडणूक होऊ घातली असून येत्या १९ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी २९ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. दरम्यान, ३ जुलैअखेर जि. प.साठी पाच उमेदवारांनी १०, तर पं. स. साठी २६ उमेदवारांनी २८ असे केवळ ३८ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, ५ जुलै ही उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत असून यादिवशी सर्वाधिक अर्ज दाखल होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयी झालेल्यांना दिले गेलेले आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्याचा मुद्दा समोर करून यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ रोजी ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचे मान्य करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुढील दोन आठवड्यांत पोटनिवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राज्य शासनासह इतरांच्या ११ पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या. सुनावणीअंती न्यायालयाने ४ मे २०२१ रोजी पुनर्विचार याचिका व स्थगिती मागणारे अर्ज फेटाळून लावले. त्यामुळे पोटनिवडणूक होणारच यावर शिक्कामोर्तब झाले.
त्यानुसार, जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे. २९ जून ते ५ जुलै यादरम्यान उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. १९ जुलै रोजी मतदान आणि २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. आजपासून अवघ्या १६ दिवसांनंतर होऊ घातलेल्या या निवडणुकीत एकमेकांसमक्ष उभे ठाकलेल्या इच्छुक उमेदवारांकडून ‘डोअर टू डोअर’ प्रचारावर विशेष भर दिला जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.
सोमवारी उमेदवारांची होणार गर्दी
जि.प. व पं.स. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार, ५ जुलै आहे. ज्यांनी अर्ज सादर केलेला नाही, त्यांची सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.