जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी शाळा बचाव समित्या सरसावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 06:04 PM2019-08-03T18:04:17+5:302019-08-03T18:04:34+5:30
वाशिम : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या टिकविण्यासाठी काही शिक्षणप्रेमी व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला असून, जिल्हाभरात शाळा बचाव समित्या स्थापन केल्या जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या टिकविण्यासाठी काही शिक्षणप्रेमी व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला असून, जिल्हाभरात शाळा बचाव समित्या स्थापन केल्या जात आहेत. विद्यार्थी संख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या शाळा वाचविण्यासाठी शाळा बचाव समित्या कार्य करणार आहेत.
विविध कारणांमुळे काही जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत आहे. यामुळे या शाळांसमोर विद्यार्थी संख्या टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विशेषत: सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असलेल्या पालकांची तसेच गोरगरीब पालकांची मुले अधिक संख्येने आहेत. त्यामुळे गरजू, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा कायम राहिल्या पाहिजे, या उदात्त हेतूने शिक्षण प्रेमी व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात शाळा बचाव समित्या स्थापन केल्या जात आहेत. यापूर्वी भटउमरा, सुरकंडी, सोमठाणा, उकळीपेन यासह अन्य काही गावांत शाळा बचाव समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शुक्रवार, २ आॅगस्ट रोजी वाशिम तालुक्यातील तामसाळा, राजगाव येथे मान्यवरांनी भेटी देवून शाळा बचाव समितीचा उद्देश स्पष्ट केले. शिक्षणप्रेमी, शिक्षक, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था व गावकरी यांच्या समन्वय व सहकार्यातून जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व टिकविण्याबरोबरच खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी अधिकाधिक समाजाभिमुख व प्रगत कसा होईल यावरही यावेळी मंथन करण्यात आले. शनिवारी तोंडगाव यासह अन्य काही गावांना भेटी देण्यात आल्या. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.