जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेकडे लक्ष !
By admin | Published: June 19, 2017 01:27 PM2017-06-19T13:27:47+5:302017-06-19T13:27:47+5:30
वाशिम जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा २० जून रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात होणार आहे
वाशिम : ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा २० जून रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात होणार आहे. या सभेत नेमक्या कोणत्या मुद्यावर वादळी चर्चा होणार, याकडे सदस्यांसह ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष लागून आहे.
सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील स्थायी समितीची ही तिसरी सभा आहे. चालू वर्षात विविध योजनेंतर्गत किती निधी येणार, अखर्चित निधी किती यासह अन्य विषयांवर या सभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. गतवेळच्या सभेतील समाजकल्याण विभागाच्या पाईप खरेदी प्रकरणावरही या सभेत आवाज उठविला जाण्याची शक्यता आहे. कारंजा तालुक्यातील शिक्षकांची नियमबाह्य बदली प्रकरणावर काय कारवाई केली, याचा अहवाल शिक्षण विभागाला द्यावा लागणार आहे. यासह आरोग्य, कृषी, बांधकाम, समाजकल्याण, महिला व बालकल्याण आदी विभागातील प्रश्नांवर स्थायी समितीची सभा गाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.