Video - जिल्हा परिषदेत पदाधिकारीविरूद्ध कर्मचारी वाद विकोपाला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 03:25 PM2019-03-05T15:25:31+5:302019-03-05T15:57:14+5:30
जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्याने हीन दर्जाची वागणूक देत शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करीत ५ मार्च रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले.
वाशिम - जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्याने हीन दर्जाची वागणूक देत शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करीत ५ मार्च रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. पदाधिकारी विरूद्ध अधिकारी, कर्मचारी असा रंगलेला हा सामना कोणते वळण घेते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.
यासंदर्भातील निवेदनात कर्मचाऱ्यांनी नमूद केले आहे, की जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचारी आढावा सभेची माहिती तयार करीत असताना १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्याठिकाणी येवून जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी वरिष्ठ सहायक गणेश झ्याटे यांच्या टेबलवर असलेल्या विविध योजनांतर्गत कामांच्या निविदा नस्ती व टिप्पणी काढून नेण्याच्या प्रयत्न केला. सदर कागदपत्रे तपासणी करून २ मार्चला सकाळी १० वाजता पुरविण्यात येतील, असे त्यांना सांगितले. मात्र, गवळी यांनी कर्मचाऱ्यांना दमदाटी करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप संबंधित कर्मचाऱ्यांनी केला आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध नियमानुसार योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा वाशिमच्या पदाधिकाऱ्यांनी ५ मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ५ मार्चपासून कामबंद आंदोलन पुकारले असून, सदर आंदोलन कोणते वळण घेते, याकडे जिल्हा परिषदेसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
निवेदनावर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय धुमाळे, कार्याध्यक्ष रमेश गोटे, जिल्हा सचिव एच.जे. परिहार यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. कामबंद आंदोलनात जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी संघटनांचे सर्व पदाधिकारी सहभागी झाल्याने कार्यालयांत शुकशुकाट दिसून आला.