जि.प. अध्यक्षांनी घेतला घरकुल योजनेचा आढावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 02:54 PM2018-10-16T14:54:50+5:302018-10-16T14:55:44+5:30
वाशिम : वाशिम तालुक्यातील घरकुल योजनेच्या कामाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी मंगळवारी वाशिम पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवकांकडून घरकुल योजनेचा आढावा घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम तालुक्यातील घरकुल योजनेच्या कामाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी मंगळवारी वाशिम पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवकांकडून घरकुल योजनेचा आढावा घेतला. घरकुल योजनेतील दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशारा दिला.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद कापडे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, वाशिमचे प्रभारी गटविकास अधिकारी डॉ. नीलेश वानखेडे आदींची उपस्थिती होती. पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये म्हणून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना हर्षदा देशमुख यांनी गटविकास अधिकाºयांसह विस्तार अधिकारी व ग्रामसेवकांना दिल्या. घरकुलाच्या बांधकामानुसार संबंधित लाभार्थीना अनुदानाचा लाभ द्यावा, अनुदानासाठी लाभार्थींना ताटकळत ठेवू नका अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. जागेअभावी कोणताही लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये म्हणून पंडीत दिनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत जागा खरेदीचे प्रस्ताव सादर करावे, पात्र प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संबंधित लाभार्थींना जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. याबरोबरच अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही जि.प. अध्यक्ष देशमुख, संजय कापडनीस, प्रमोद कापडे, नितीन माने आदींनी दिल्या.