जि.प. शिक्षकांच्या ‘पीएफ’चा हिशेब मिळेना!

By admin | Published: January 30, 2017 03:26 AM2017-01-30T03:26:36+5:302017-01-30T03:26:36+5:30

तांत्रिक अडचण; वाशिम जिल्ह्यातील तीन हजार शिक्षक संभ्रमात

Zip Teachers' PFs do not get accounted for! | जि.प. शिक्षकांच्या ‘पीएफ’चा हिशेब मिळेना!

जि.प. शिक्षकांच्या ‘पीएफ’चा हिशेब मिळेना!

Next

वाशिम, दि. २९- जिल्ह्यांतर्गत येणार्‍या सर्व प्राथमिक शाळांमधील तीन हजारांहून अधिक शिक्षकांच्या नियमित वेतनातून कपात होणार्‍या भविष्य निर्वाह निधीचा २0१५-१६ चा हिशेबच त्यांना सहा महिन्यांपासून मिळाला नाही. त्यामुळे शिक्षकवर्गात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भविष्य निर्वाह निधी म्हणजे सर्वसाधारणपणे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी नवृत्त झाल्यावर त्याला उर्वरित आयुष्यात आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मिळणारी रक्कम असून, ही रक्कम शिक्षक कर्मचार्‍याच्याच वेतनातून दरमहा निश्‍चित केल्यानुसार कपात करून भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा करण्यात येते. या निधीतून काही रक्कम गरजेनुसार वेळोवेळी काढण्याचा अधिकारही शिक्षकांना असतो. वेतनातून भविष्य निर्वाह निधी म्हणून कपात करण्यात येणार्‍या रकमेचा वापर कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडण्याच्या हेतूने संबंधित कर्मचारी किंवा शिक्षक करतात; मात्र त्यासाठी त्यांना भविष्य निर्वाह निधीत किती रक्कम आहे, त्याची माहिती असणे आवश्यक असते आणि भविष्य निर्वाह निधीचे विवरण पत्र मिळाल्यानंतरच त्याचा अंदाज येऊ शकतो. २0१५-१६ या वर्षातील याबाबतचे विवरण पत्र प्राथमिक शिक्षकांना अद्याप मिळाले नाही. साधारण ऑगस्ट महिन्यात ही विवरण पत्रे त्यांना मिळायला हवीत; परंतु आता चार महिने उलटले आणि दुसरे आर्थिक वर्ष सुरू झाले तरी, जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीच्या खात्याचे विवरण पत्रच प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे शिक्षक वर्ग संभ्रमात आहे.
कपात होणार्‍या जीपीएफच्या रकमेत तफावत
शिक्षक आणि कर्मचारी यांचे वेतन मागील वर्षी ह्यऑनलाइनह्ण झाले. त्यामुळे त्यांच्या वेतनातून कपात होणारी भविष्य निर्वाह निधीच्या रकमेत बर्‍याच वेळेस तफावत येत आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन वेतन अदायगीत येणारी तफावत जुळवण्यासाठी बराच वेळ लागतो. भविष्य निर्वाह निधीच्या जमा रकमेवर शासन व्याज देते. चुकीच्या नोंदीमुळे व्याज आकारणी जास्त झाल्यास शासनाचे आर्थिक नुकसान होऊ शकते. सहावा वेतन आयोग लागल्यानंतर त्यांना देय रक्कम पाच हप्त्यात अदा करावयाची होती. ती अदा करताना हप्ता जमा केल्यानंतर त्याची नोंद सेवापुस्तकात प्रमाणक क्रमांक व दिनांकासह करणे आवश्यक आहे. सदर नोंदी वेळीच न घेतल्याने बर्‍याच कर्मचार्‍यांचे पाचपेक्षा जास्त हप्ते जमा झाले आहेत. जास्त जमा झालेले हप्ते शोधून शासन खाती जमा करणे आवश्यक आहे, तर काही ठिकाणी चुकीचे हप्ता क्रमांक नोंदवल्यामुळे कर्मचार्‍यांचे नुकसान होऊ नये, याचीसुद्धा तपासणी करावी लागत आहे. याच कारणामुळे भविष्य निर्वाह निधीचे विवरण पत्र वितरित करण्यास विलंब होत आहे. तथापि, फेब्रुवारीच्या अखेरीस ही विवरण पत्रे शिक्षकांना वितरित करता येतील, असे जिल्हा परिषदेच्या लेखा विभागातील कनिष्ठ लेखा अधिकारी जितेंद्र मनोहर यांनी सांगितले.

Web Title: Zip Teachers' PFs do not get accounted for!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.