जि.प. निवडणुकीसाठी इच्छुकांनी वाढविला जनसंपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:43 AM2021-04-01T04:43:23+5:302021-04-01T04:43:23+5:30
जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून, सर्वच राजकीय पक्षांकडून योग्य उमेदवारांच्या निवडीकरिता तयारीला प्रारंभ झाला आहे. सर्कलमध्ये ...
जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून, सर्वच राजकीय पक्षांकडून योग्य उमेदवारांच्या निवडीकरिता तयारीला प्रारंभ झाला आहे. सर्कलमध्ये आधीचे आरक्षण नामाप्र महिला असताना अनेक मातब्बर उमेदवारांना पर्याय म्हणून पत्नी, आई या कुटुंबातील सदस्यांना निवडणूक लढवावी लागली. यामध्ये अवघ्या शंभर मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने बाजी मारली तर काँग्रेस, जनविकास आघाडीचे उमेदवार अनुक्रमे एक व दोन क्रमांकावर राहिले. हल्ली मात्र बदललेल्या आरक्षणाने बहुतांश इच्छुक उमेदवारांकरिता घोडा मैदान साफ झाल्याने होळी-धूलिवंदनाच्या मुहूर्तावर अनेकांनी सर्कलमध्ये भेटीगाठींचे सत्र अवलंबिले.
या सर्कलमधील मोप पंचायत समिती गणाचे आधीचे आरक्षण ओबीसी महिला होते. त्यामध्ये बदल होत आता सर्वसाधारण महिला झाल्याने मागील जिल्हा परिषदेच्या रेसमधील काही उमेदवार दोन पाऊल माघार घेत जि.प.पेक्षा पंचायत समिती उमेदवारीला प्राधान्य देण्याच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा आहे. कारण रिसोड पंचायत समितीवर हल्ली जनविकास आघाडीचा झेंडा आहे. जिल्हा परिषद उमेदवारीसाठीसुद्धा काही नवीन चेहरे नव्याने राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षाकडून नशीब अजमाविण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगत आहे.